पनवेल : मुख्यमंत्र्यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महानगरपालिकेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत इतिहास घडवला आहे. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांमध्ये पनवेल महानगरपालिका अव्वल ठरली आहे. आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त कैलास गावडे आणि संगणक विभागाचे उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या टीमने अथक मेहनत घेत हे यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, याआधी 100 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमातही पनवेल महानगरपालिकेने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला होता. या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये संकेतस्थळ अधिक सुलभ, सुरक्षित आणि अद्ययावत करणे, आधुनिक डॅशबोर्ड विकसित करणे, ‘आपले सरकार’ अंतर्गत नागरिकांना वेळेत सेवा देणे, ई-ऑफिसचा प्रभावी वापर, व्हॉट्सॲप चॅटबोट, एआय आणि जीआरएस प्रणालीचा वापर अशा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश होता.
आयुक्त मंगेश चितळे यांनी पदभार स्वीकारताच ई-ऑफिस सुरू करण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या ‘पनवेल कनेक्ट ॲप’मुळे नागरिकांना सेवा अधिक सोप्या आणि जलद मिळू लागल्या. याच उपक्रमांचा या स्पर्धेत मोठा फायदा झाला. या सर्व घटकांचे सादरीकरण 10 जानेवारी रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेचे मूल्यांकन क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडिया (QCI) या राष्ट्रीय संस्थेने पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने केले. एकूणच ई-गव्हर्नन्समध्ये राज्यात अव्वल ठरलेली पनवेल महानगरपालिका आज ‘स्मार्ट प्रशासनाचा आदर्श’ ठरत असून, पनवेलकरांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे, असे मत आयुक्त मंगेश चितळे यांनी व्यक्त केले आहे.
*एकच नंबर…पनवेलकर*
*१५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत इ गव्हर्नन्समध्ये पनवेल महानगरपालिका राज्यात प्रथम* मा मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत इ गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर झाला.… pic.twitter.com/rEfWSG3XjZ — Panvel Municipal Corporation (@PanvelCorp) January 26, 2026
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.