छत्रपती संभाजीनगर: आजच्या या ऑनलाईन युगामध्ये फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. अनेक अमिश दाखवून तरुण वृद्ध यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते. असाच एक प्रकार संभाजीनगरमधून समोर आला आहे. संभाजीनगरमध्ये एका सायबर गुन्हेगाराने पॅनकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेच्या बँक खात्यातून 21 लाख 88 हजार 868 रुपये फसवणुकीतून काढले. नाथ प्रांगणमधील रहिवासी निलीमा सुधीर श्रॉफ आणि त्यांच्या पतीचे आयसीआयसीआय बँकेत संयुक्त खाते आहे.
घटनेची सुरुवात जानेवारी महिन्यात झाली. निलीमा यांना अनोळखी मोबाईल नंबरवर कॉल आला, ज्यामध्ये कॉल करणाऱ्याने बँकेतून पॅनकार्ड अपडेट करण्यासाठी बोलत असल्याचे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून, निलिमा यांनी मोबाईलवर त्याने पाठविलेल्या लिंकवर क्लिक केली. लिंक ओपन केल्यानंतर, त्यांचे बँक खाते तपासल्यावर लक्षात आले की, त्यांच्याकडून मोठी रक्कम काढली गेली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ११ महिन्यांनी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या फसवणूक आणखी कोणाची होऊ नये व सायबर फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी, अनोळखी कॉल किंवा लिंकवर क्लिक करणे टाळण्याचे आणि आपल्या बँक खात्याची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.