पुणे : ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी मुंबईच्या दिशेने ‘महा एल्गार मोर्चा’ काढण्याची घोषणा केली आहे. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असली, तरी लक्ष्मण हाके मुंबईला जाण्यावर ठाम आहेत. दौंड तालुक्यातील पाटस येथून हा मोर्चा थोड्याच वेळात मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. लक्ष्मण हाके हे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून वाजतगाजत पाटस टोलनाक्याकडे रवाना झाले आहेत. राज्यभरातील ओबीसी बांधवांनी पाटस येथे एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यानुसार पाटस टोलनाक्यावर सर्व ओबीसी कार्यकर्ते एकत्र जमून तेथून मुंबईकडे कूच करणार आहेत.
लक्ष्मण हाके म्हणाले की, “आम्ही रणगाडे, तोफगोळे घेऊन मुंबईला चाललो आहे का? की एखादे विमान पाडण्यासाठी मुंबईला चाललो आहे? आम्ही आमचे हक्काचे आरक्षण वाचवण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालो आहोत. पोलिसांनी त्यांचे काम केले आहे, आम्ही आमच्या मागण्या घेऊन निघालो आहोत. गरज पडल्यास पोलिसांनी आम्हाला अटक करावी. पण कोणत्याही ओबीसी नेत्याने पाठिंबा दिला नाही तरीही हे आंदोलन थांबणार नाही,” असे त्यांनी म्हटले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.