Konkan Ferry Service: कोकणातील प्रवाशांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई ते सिंधुदुर्गमधील विजयदुर्ग दरम्यान सुरू झालेल्या बहुप्रतीक्षित रो-रो (Ro-Ro) फेरी सेवेला लवकरच आणखी दोन महत्त्वाचे थांबे मिळणार आहेत. आतापर्यंत भाऊचा धक्का ते विजयदुर्ग या मार्गावर सुरू असलेली ही सेवा भविष्यात रत्नागिरीतील जयगड आणि सिंधुदुर्गातील वेंगुर्ला येथेही थांबणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई आणि कोकण यांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नेहमीच रेल्वेची प्रचंड गर्दी किंवा रस्त्यावरील लांबचा आणि खडतर प्रवास सहन करावा लागतो. विशेषतः सणासुदीच्या काळात रेल्वे तिकीट मिळवणे कठीण होते, तर रस्ते मार्गाने प्रवास करताना वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांचा त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत सागरी मार्गाने सुरू करण्यात आलेली ही रो-रो सेवा कोकणवासीयांसाठी एक मोठा पर्याय ठरत आहे.
होळीच्या पूर्वसंध्येला मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान एम-टू-एम रो-पॅक्स फेरी सेवेला अधिकृत सुरुवात करण्यात आली. या सेवेला मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते हिरवा कंदील दाखवण्यात आला. पहिल्या टप्प्यात ही सेवा मुंबईतील भाऊचा धक्का येथून विजयदुर्गपर्यंत सुरू करण्यात आली आहे. या फेरी सेवेच्या माध्यमातून प्रवासी तसेच काही वाहनेही समुद्रमार्गाने नेण्याची सुविधा उपलब्ध आहे.
या सेवेचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. मुंबईहून कोकणातील विजयदुर्गपर्यंत पोहोचण्यासाठी साधारणतः ६ ते ७ तासांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे लांबचा आणि थकवणारा रस्त्याचा प्रवास टाळून प्रवासी कमी वेळात आपल्या गावात पोहोचू शकणार आहेत.
दरम्यान, या मार्गावर आणखी दोन थांबे सुरू करण्यासाठी संबंधित यंत्रणा कामाला लागली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे प्रवासी बोटीला थांबा देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी आवश्यक जेट्टी आणि इतर सुविधा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
संबंधित कामे पुढील काही आठवड्यांत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर या दोन्ही ठिकाणी फेरी सेवेचे थांबे सुरू करण्यात येतील. हे थांबे सुरू झाल्यानंतर कोकणातील आणखी अनेक भागातील प्रवाशांना या सेवेचा फायदा होणार आहे.
मुंबई आणि कोकण यांदरम्यान जलमार्गाने प्रवासाची सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने ही रो-रो सेवा महत्त्वाची मानली जात आहे. भविष्यात या मार्गावर अधिक सेवा सुरू झाल्यास कोकणातील पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नव्या सेवेबद्दल कोकणवासीयांमध्ये उत्सुकता आणि समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.