मुंबई : शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी चिन्ह गोठवण्याची मागणी केली. त्यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टाने केवळ पर्याय विचारल्याने चिन्ह गोठवण्याचा पर्याय आमच्याकडून देण्यात आल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी हा दावा केला आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि वकील देवदत्त कामत यांनी काल केलेल्या युक्तिवादाचं संजय राऊत यांनी कौतुक केलं आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे मी त्यावर अधिक भाष्य करणार नाही. काल युक्तिवाद झाला आहे. सिब्बल आणि कामत यांनी चांगले तांत्रिक मुद्दे मांडले आहेत. कपिल सिब्बल आणि कामत यांचा युक्तिवाद स्पष्ट आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे तुम्ही या प्रकरणात वाचवतायं का?, तुम्ही या प्रकराणाला पाठिंबा देतायं का?, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. तसेच वरून म्हणजेच केंद्रातून भाजप आणि शिंदे शिवसेनाकडून दबाव येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, दिल्लीमध्ये काल काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक पार पडली. यावरही राऊत यांनी भाष्य केले. या बैठकीत विविध मुद्द्यांवर आणि पक्षाच्या भविष्यातील रणनीतीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 ते 8 महिन्यांत पंतप्रधानपदी राहणार नाहीत, असे राहुल गांधी यांनी बैठकीत म्हटल्याची माहिती आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, मग मी गेले काही दिवस झाले काय सांगतो आहे, राहुल गांधींचं माझं एकमत आहे या विषयावर, मला माहिती आहे ना, गेले काही महिने मी हेच सांगतोय की, हे महाशय जे आहेत प्रधानमंत्री सध्या, ते त्यांची टर्म पूर्ण करत नाहीयेत. त्यांना अत्यंत वाईट परिस्थितीत हे पद सोडावे लागत आहे, तुम्हाला 17 सप्टेंबर नंतर या गोष्टीचा उलगाडा होईल, असंही पुढे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.