Shivaji Rao Kokate Death : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अद्याप आपल्या सर्वोच्च नेत्याच्या, म्हणजेच अजित पवारांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरलेली नसतानाच, पक्षावर दुःखाचा आणखी एक डोंगर कोसळला आहे. सिन्नरचे आमदार आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे वडील शिवाजीराव मुरलीधर कोकाटे (आप्पा) यांचे वयाच्या 93 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने नाशिक जिल्हा आणि सहकार क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
सहकार आणि सामाजिक कार्याचा वारसा
शिवाजीराव कोकाटे यांनी कोळपेवाडी सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून प्रदीर्घ काळ काम पाहिले होते. ग्रामीण भागातील अर्थकारण आणि सहकार चळवळ मजबूत करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या पश्चात आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. बुधवारी त्यांच्या निधनानंतर सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.
दिग्गज नेत्यांकडून श्रद्धांजली
शिवाजीराव कोकाटे यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी सोमठाणे येथे उपस्थित राहून शिवाजीराव आप्पांचे अंत्यदर्शन घेतले. "कोकाटे कुटुंबावर आलेला हा पितृशोक अत्यंत दुःखद आहे," अशा भावना व्यक्त करत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. तथापी, आमदार विजयसिंह पंडित यांनीही कोकाटे कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त करताना शिवाजीराव कोकाटे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी प्रार्थना केली. दरम्यान, अजित दादांच्या निधनानंतर राज्यात ठिकठिकाणी शोकसभेचे आयोजन केले जात आहे. पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आधीच शोकाकुल असताना, माणिकराव कोकाटे यांच्या वडिलांच्या निधनाने सिन्नर मतदारसंघासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.