राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेला निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार नागरिकांना आता १७ ऑगस्टपर्यंत मतदार नोंदणी, माहिती दुरुस्ती आणि आवश्यक अर्ज सादर करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे अद्याप प्रक्रिया पूर्ण न झालेल्या लाखो मतदारांना दिलासा मिळाला आहे.
१७ ऑगस्टपर्यंत कोणती कामे करता येणार?
नवीन वेळापत्रकानुसार 17 ऑगस्टपर्यंत नागरिकांना खालील कामे करता येणार आहेत.
– नवीन मतदार म्हणून नोंदणी करता येणार.
– मतदार यादीतील नाव, पत्ता किंवा इतर तपशीलात दुरुस्ती करता येणार.
– आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज सादर करता येणार.
– SIR प्रक्रियेसाठी आवश्यक माहिती अद्ययावत करता येणार.
निवडणूक आयोगाने नागरिकांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
'या' दिवशी प्रसिद्ध होणार प्रारूप मतदारयादी
सुधारित वेळापत्रकानुसार 22 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीत मतदारांनी आपले नाव, पत्ता आणि इतर तपशील काळजीपूर्वक तपासावेत. कोणतीही चूक आढळल्यास किंवा नाव नसल्यास हरकत आणि दुरुस्तीसाठी अर्ज करता येणार आहे.
SIR मोहिमेचा उद्देश काय?
विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) मोहिमेचा मुख्य उद्देश मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक बनवणे हा आहे. या प्रक्रियेद्वारे मृत, स्थलांतरित, दुबार किंवा अपात्र मतदारांची नावे वगळून पात्र नागरिकांची नोंद निश्चित केली जाणार आहे.
नागरिकांना आयोगाचे आवाहन
निवडणूक आयोगाने सर्व पात्र नागरिकांनी आपली मतदार नोंदणी आणि तपशील वेळेत पडताळून घ्यावेत, असे आवाहन केले आहे. प्रथमच मतदान करणारे युवक, पत्ता बदललेले मतदार आणि अद्याप नोंदणी न केलेल्या नागरिकांनी 17 ऑगस्टपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.