Latur Election 2026: विलासरावांच्या आठवणी पुसण्याची भाषा? रवींद्र चव्हाणांच्या ‘त्या’ वक्तव्याने लातूर पेटले; पाहा कोण काय म्हणाले?

काँग्रेसने या वक्तव्याचा तीव्र निषेध करत लातूरच्या अस्मितेवर हल्ला झाल्याचा आरोप केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत हा मुद्दा केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.
Latur Election 2026: विलासरावांच्या आठवणी पुसण्याची भाषा? रवींद्र चव्हाणांच्या ‘त्या’ वक्तव्याने लातूर पेटले; पाहा कोण काय म्हणाले?

लातूर: आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर लातूरचे राजकीय वातावरण एका वादग्रस्त विधानाने पेटले आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्याचे दिवंगत लोकनेते आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे काँग्रेसने भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून “विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील,” असे विधान चव्हाण यांनी लातूरमध्ये केले, ज्याचे तीव्र पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत.

रवींद्र चव्हाण यांच्या या विधानामुळे केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे, तर सर्वसामान्य लातूरकरांमध्येही संतापाची लाट आहे. विलासराव देशमुख यांनी लातूरला जागतिक नकाशावर स्थान मिळवून दिले असताना, त्यांच्या आठवणी पुसण्याची भाषा करणे चुकीचे असल्याची भावना काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे. सत्तेच्या जोरावर भाजप नेत्यांची भाषा बदलल्याचा आरोप करत काँग्रेसने हा विलासराव देशमुखांच्या कर्तृत्वाचा अपमान असल्याचे म्हटले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी रवींद्र चव्हाणांचा समाचार घेताना सडेतोड इशारा दिला. “विलासरावजींच्या आठवणी पुसू शकणारा माणूस अजून जन्माला यायचा आहे. ज्यांनी आयुष्य लातूरसाठी समर्पित केले, त्यांच्याबद्दल सत्तेचा माज असलेले नेते बरळून जात आहेत. लातूरच्या कर्तृत्वसंपन्न सुपुत्राचा अपमान इथली जनता कधीही सहन करणार नाही; भाजपवाल्यांनो याद राखा, करारा जवाब मिळेल!” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.


 

हेही वाचा: Mumbai Municipal Corporation Election 2026 : मनसेला आणखी एक धक्का! वॉर्ड क्रमांक 194 नाकारणं राज ठाकरेंना पडलं महागात ; भाजप प्रवेश कन्फॉर्म

विलासरावांचे सुपुत्र आणि माजी मंत्री अमित देशमुख यांनीही या विधानाचा तीव्र निषेध नोंदवला. “रवींद्र चव्हाण यांनी केलेले विधान अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायक आहे. भारतीय जनता पक्षाकडून अशा प्रकारच्या हीन वक्तव्याची आम्हाला मुळीच अपेक्षा नव्हती. या विधानामुळे आम्हा सर्व लातूरकरांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत,” असे म्हणत त्यांनी भाजपच्या संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अमित देशमुखांच्या या भूमिकेला लातूरमधून मोठे जनसमर्थन मिळत आहे.

कोल्हापूरचे नेते सतेज पाटील यांनीही या वादात उडी घेत भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. लातूर आणि विलासराव देशमुख हे समीकरण अतूट असून ते फोडणे कोणालाही शक्य नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. निवडणुकांच्या निमित्ताने लातूरमध्ये आलेले भाजपचे बाहेरील नेते स्थानिक अस्मितेवर घाला घालत असल्याचा सूर आता काँग्रेसकडून आळवला जात आहे.

एकूणच, विकासाच्या मुद्द्यांवरून सुरू झालेली ही निवडणूक आता ‘अस्मितेच्या लढाई’कडे वळली आहे. विलासराव देशमुखांच्या प्रतिमेला धक्का लावण्याचे प्रयत्न भाजपला महागात पडणार की राजकीय समीकरणे बदलणार, हे आगामी निवडणुकीत स्पष्ट होईल. मात्र, सध्या लातूरच्या राजकीय आखाड्यात केवळ ‘विलासराव विरुद्ध भाजप’ असाच सामना रंगताना दिसत आहे.

हेही वाचा: Suresh Kalmadi : पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन; वयाच्या ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version