Ladki Bahin Yojana: रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा! 53 हजारांहून अधिक महिलांना ओवाळणी नाही; नेमकं कारण काय?

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येत आहे.
Ladki Bahin Yojana: रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा! 53 हजारांहून अधिक महिलांना ओवाळणी नाही; नेमकं कारण काय?

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येत आहे. मात्र, या योजनेतील सुमारे 53 हजार 637 महिलांना यावेळी 1500 रुपयांचा लाभ मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या निमित्ताने सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीपासून या महिलांना वंचित राहावं लागलं आहे.

राज्य सरकारने 2024 मध्ये ही योजना सुरू केली. सुरुवातीला योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर महिलांनी अर्ज केले होते. मात्र, त्यानंतर लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी, आधारशी संबंधित तपासणी आणि ई-केवायसी यासह पात्रतेच्या विविध निकषांची छाननी करण्यात आली. या प्रक्रियेत मोठ्या संख्येने अर्ज अपात्र ठरल्याने लाभार्थी महिलांची संख्या कमी झाली आहे.

हेही वाचा: Nepal Flood : नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 प्रवाशांचा परतीचा प्रवास सुरू! फडणवीसांचा पुढाकार, व्हिडिओ कॉलवरून साधला संवाद

उपलब्ध माहितीनुसार, योजनेसाठी अर्ज करणाऱ्या सुमारे 2 कोटी 48 लाख महिलांपैकी जवळपास 92 लाख नोंदी विविध कारणांमुळे अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या सुमारे 1 कोटी 65 लाखांच्या आसपास आली आहे.

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर 25 ऑगस्टपासून जुलै महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत सुमारे 1 कोटी 41 लाख 85 हजार महिलांच्या खात्यांमध्ये तब्बल 2 हजार 95 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आल्याची माहिती आहे. उर्वरित पात्र महिलांच्या खात्यांमध्येही निधी वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

मात्र, वयोमर्यादा हा या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना पात्रता देण्यात आली आहे. 65 वर्षांची मर्यादा ओलांडलेल्या महिलांना योजनेचा लाभ पुढे सुरू ठेवता येत नाही. त्यामुळे अशा अनेक महिलांची नावे लाभार्थी यादीतून कमी झाली आहेत. याच कारणामुळे सुमारे 53 हजार 637 महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळणार नसल्याची माहिती आहे.

दरम्यान, उर्वरित सुमारे 23 लाख पात्र महिलांच्या खात्यांमध्येही निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने रक्षाबंधनाच्या दिवशी किंवा त्यानंतर त्यांना हप्ता मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Supriya Sule: ‘आजही वाटतं, तू कुठूनतरी अचानक येशील…’ रक्षाबंधनाच्या दिवशी सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट; वाचून तुमचेही डोळे पाणावतील

या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे अनेक कुटुंबांसाठी हा निधी महत्त्वाचा ठरतो. मात्र, पात्रतेच्या निकषांनुसार लाभार्थी यादीत झालेल्या बदलांमुळे काही महिलांना योजनेचा लाभ गमवावा लागला आहे.

यापूर्वी रक्षाबंधनाच्या काळात सरकारने अतिरिक्त हप्ते देऊन या योजनेला ‘ओवाळणी’चा संदर्भ दिला होता. यंदाही रक्षाबंधनाच्या निमित्ताने हप्ता वितरित करण्यात आल्याने महिलांमध्ये त्याबाबत उत्सुकता होती. मात्र, पात्रता तपासणीनंतर हजारो महिलांना या मदतीपासून दूर राहावं लागल्याने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version