Hidayat Patel Attack: अकोला जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात प्राणघातक हल्ला झाला आहे. त्यांच्या मोहाळा या मूळ गावी हा धक्कादायक प्रकार घडला असून, या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, गावातील जुन्या राजकीय वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 'मतीन पटेल' गटातील व्यक्तीने हिदायत पटेल यांच्यावर चाकूने सपासप वार केल्याची माहिती समोर येत आहे. हा हल्ला इतका भीषण होता की पटेल गंभीर जखमी झाले आहेत. अकोट येथील प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी अकोला शहरातील मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला आहे.
हल्ल्याचे कारण काय?
हिदायत पटेल यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत पटेल यांनी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात काम केल्याचा आरोप काँग्रेसच्याच नगराध्यक्ष उमेदवार अलका बोडके यांनी केला होता. या अंतर्गत राजकीय संघर्षातून हा हल्ला झाला असावा, अशी चर्चा अकोट परिसरात रंगली आहे.
हेही वाचा – Nashik Crime : भयंकर! लोखंडी पाईपने डोक्यावर, तोंडावर व ओठांवर वार, मुलानेच काढला वडिलांचा काटा
कोण आहेत हिदायत पटेल?
हिदायत पटेल हे विदर्भातील काँग्रेसचे अनुभवी आणि मातब्बर नेते मानले जातात. त्यांनी 2014 आणि 2019 अशा सलग दोन लोकसभा निवडणुका काँग्रेसच्या तिकिटावर लढवल्या आहेत. सध्या ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
पोलीस कारवाई सुरू
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मोहाळा गावात धाव घेतली असून परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. हल्लेखोराची ओळख पटली असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. तथापी, अकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.