PMC Election: अजित पवारांना गुन्हेगारीमुक्तीच्या दाव्याचा विसर? मारणेनंतर आता आंदेकर टोळीच्या दोन महिलांना राष्ट्रवादीचे तिकीट

कुख्यात गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे यांच्यानंतर, आता चक्क खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या आंदेकर टोळीतील दोन महिलांना पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.<br/>
PMC Election: अजित पवारांना गुन्हेगारीमुक्तीच्या दाव्याचा विसर? मारणेनंतर आता आंदेकर टोळीच्या दोन महिलांना राष्ट्रवादीचे तिकीट

PMC Election: पुणे गुन्हेगारीमुक्त करणार असा शब्द देणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका निवडणुकीसाठी घेतलेल्या एका निर्णयामुळे पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कुख्यात गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे यांच्यानंतर, आता चक्क खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या आंदेकर टोळीतील दोन महिलांना पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.

तुरुंगातून लढणार निवडणूक 

राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) प्रभाग क्रमांक 23 मधून सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. विशेष म्हणजे या दोघीही सध्या 'आयुष कोमकर' मृत्यू प्रकरणात येरवडा कारागृहात आहेत. विशेष न्यायालयाने त्यांना निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची सशर्त परवानगी दिली असून, 27 डिसेंबर रोजी त्यांनी पोलीस बंदोबस्तात आपला अर्ज दाखल केला होता. अर्ज भरताना किंवा प्रचारादरम्यान कोणतीही मिरवणूक, घोषणाबाजी किंवा प्रक्षोभक भाषणे न करण्याचे कडक निर्बंध न्यायालयाने त्यांच्यावर लादले आहेत.

हेही वाचा – PMC Election: दीपक मानकरांच्या दोन पुत्रांना दोन वेगवेगळ्या पक्षांची उमेदवारी; एका मुलाच्या हाती 'घड्याळ', दुसऱ्याच्या हाती 'कमळ'

पुण्याच्या राजकारणात 'गँगवॉर'ची छाया?

पुण्यातील नाना पेठ भागात वनराज आंदेकर यांची हत्या आणि त्यानंतर सूडापोटी झालेली आयुष कोमकरची हत्या, या घटनांमुळे पुण्याचे गुन्हेगारी विश्व हादरले होते. या खून प्रकरणात बंडू आंदेकर यांच्यासह 13 जणांवर 'मकोका' अंतर्गत कारवाई झाली आहे. अशा पार्श्वभूमीवर, अजित पवारांच्या पक्षाने आंदेकर कुटुंबातील महिलांना 'एबी' फॉर्म दिल्याने, निवडून येण्याच्या क्षमतेसाठी गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे डोळेझाक केली जात असल्याची टीका होत आहे.

अजित पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

एकीकडे शहरात गुन्हेगारांचे वर्चस्व मोडीत काढण्याचे आश्वासन सरकारकडून दिले जाते, तर दुसरीकडे राजकीय पक्ष त्याच कुटुंबांना उमेदवारी देत आहेत. प्रभाग 10 मध्ये गजा मारणेची पत्नी आणि प्रभाग 23 मध्ये आंदेकर कुटुंबातील महिला या दोन्ही नियुक्त्यांमुळे पुण्यात राष्ट्रवादीच्या रणनीतीवर विरोधकांनी निशाणा साधला आहे.

हेही वाचा – Ravindra Dhangekar: पुण्यात महायुतीचा खेळखंडोबा ! धंगेकर-भाजप वादामुळे शिंदे गटाचा स्वबळावर लढण्याचा नारा

काय आहे नेमंक प्रकरण? 

गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर याला गोळ्या झाडून संपवण्यात आलं होतं. या खुनाचा आरोप आंदेकर टोळीवर असून, या प्रकरणात बंडू आंदेकर यांचा मुलगा कृष्णराज आंदेकर याने पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली होती. 5 कोटी 40 लाखांच्या खंडणी प्रकरणातही या कुटुंबातील सदस्यांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version