अजय घोडके, प्रतिनिधी, लातूर
लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते सुधाकर भालेराव आज, मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी 2009-2019 या कालावधीत लातूर जिल्ह्यातील 'उदगीर' या राखीव मतदारसंघातून भाजपचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने विद्यमान आमदार असलेल्या भालेरावांचे तिकीट कापले. त्यामुळे 2024 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुधाकर भालेरावांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात मुंबई येथे जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादीने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली. परंतु त्यांचा दारुण पराभव झाला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत झालेल्या पडझडीनंतर उदगीर विधानसभा मतदारसंघातील भालेरावांच्या कार्यकर्त्यांचे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय भवितव्य काय?, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला गेला. ज्या कार्यकर्त्यांनी भालेरावांना विधानसभा निवडणुकीत मदत केली. त्यांच्या भवितव्यासाठी भालेरावांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणी केली, अन् शिवसेना पक्ष प्रवेशाचा निर्णय झाला असल्याचे भालेरावांनी सांगितले आहे. आज होणाऱ्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्याला लातूर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
माजी आमदार सुधाकर भालेराव हे 'जनाधार मोर्चा' या राज्यव्यापी सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. यापूर्वी 'मातंग शक्ती' या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण केले आहे. दलित समाजाचा आश्वासक चेहरा म्हणून सुधाकर भालेराव यांची ओळख आहे. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात मुंबईतील ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरू धर्मवीर आनंद दिघे यांच्यापासून झाली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या परिवाराशी भालेरावांचा जुना ऋणानुबंध आहे. भालेराव यांच्या शिवसेना प्रवेशानंतर लातूर जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मोठी ताकद मिळणार आहे. आज राज्याचे उद्योगमंत्री तानाजी सावंत यांच्या 'मुक्तागिरी' या शासकीय बंगल्यावर सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उद्योगमंत्री तानाजी सावंत व शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत सुधाकर भालेराव आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करणार असून त्यांना शिवासेनेत मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती स्वतः सुधाकर भालेराव यांनी 'जय महाराष्ट्र'ला दूरध्वनीवरून दिली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.