Malegaon Lift Collapse : मालेगाव महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर निवडीचा सोहळा पार पडल्यानंतर काही वेळातच एक अतिशय धक्कादायक घटना घडली. महापालिका इमारतीची लिफ्ट चौथ्या मजल्यावरून थेट खाली कोसळल्याने मोठी खळबळ उडाली. या लिफ्टमध्ये इस्लाम पार्टीचे नेते आसिफ शेख, काही नगरसेवक आणि पत्रकारांसह एकूण 18 जण अडकले होते. सुदैवाने, या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नेमकं काय घडलं?
निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते लिफ्टने खाली येत असताना हा अपघात झाला. क्षमतेपेक्षा जास्त लोक (ओव्हरलोड) लिफ्टमध्ये शिरल्याने आणि लिफ्टची चैन अचानक तुटल्याने ही दुर्घटना घडली. लिफ्ट चौथ्या मजल्यावरून वेगाने खाली आली, परंतु ती थेट तळमजल्यावर न आदळता पहिल्या मजल्याजवळ अडकली. यामुळे मोठा अपघात टळला.
भिंत तोडून करण्यात आली सुटका
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने धाव घेतली. लिफ्ट पहिल्या मजल्यावर अडकल्याने दरवाजा उघडणे कठीण झाले होते. अखेर भिंतीचा काही भाग तोडून आतील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे पालिकेच्या परिसरात काही काळ तणावाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
निवडणूक निकालात इस्लाम पार्टी आणि सपाची बाजी
अपघातापूर्वी पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या पाठिंब्याने 'इस्लाम पार्टी' आणि 'समाजवादी पार्टी'ने पालिकेवर आपले वर्चस्व सिद्ध केले. या निवडणुकीत भाजप आणि एमआयएम (MIM) तटस्थ राहिले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या देखरेखीखाली ही संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडली, मात्र त्यानंतर झालेल्या लिफ्ट अपघाताने प्रशासनाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.