Gondia : गोंदियात कृषी विभागाचा दणका; जिल्ह्यातील 9 कृषी केंद्राचे परवाने रद्द, तर 45 केंद्राचे परवाने निलंबित

Gondia : गोंदियात कृषी विभागाचा दणका; जिल्ह्यातील 9 कृषी केंद्राचे परवाने रद्द, तर 45 केंद्राचे परवाने निलंबित

गोंदिया : खरीप हंगामादरम्यान खते, बियाणांचा काळाबाजार टाळण्यासाठी कृषी विभागाने भरारी पथकाच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यात धडक तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान तब्बल 45 केंद्रांमध्ये अनियमितता आढळल्याने त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले. तर 9 कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले. कृषी विभागाच्या या कार्यवाहीने कृषी केंद्र संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. खरीप हंगामादरम्यान कृषी केंद्र संचालकांकडून खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री केली जाते. मात्र काही कृषी केंद्र संचालक अधिक नफा कमविण्याच्या हेतूने बोगस बियाणे, कीटकनाशकांची विक्री करून शेतकऱ्यांची दिशाभूल करतात. तर काहींकडून खतांची साठेबाजी करून अतिरिक्त दराने विक्री केली जाते. अलीकडे राज्यात निर्बंध असलेल्या बियाणे आणि कीटकनाशकांच्या विक्रीत वाढ झाली आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी कृषी विभागाने गोंदिया जिल्ह्यातील सर्व 999 कृषी केंद्रांची धडक तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान काही कृषी केंद्रांमध्ये स्टॉकनुसार खताचा साठा नसणे, दर्शनी भागावर दरपत्रक न लावणे, स्टॉक बुक नियमित न ठेवणे, ई-पास मशिनवर खताची विक्री न करणे, परवाना नूतनीकरण न करणे, अतिरिक्त दराने खताची विक्री करणे, शेतकऱ्यांना खते, बियाणे विक्रीची पक्की पावती न देणे आदी त्रुटी भरारी पथकाच्या निदर्शनास आल्या. त्यामुळे 15 बियाणे विक्रेते, 22 खते विक्रेते आणि 11 कीटकनाशक विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले. तर 3 बियाणे, 3 खत विक्रेते आणि 3 कीटकनाशक विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश कानवडे यांनी सांगितले.

हेही वाचा : Sangli Crime: सांगली हादरलं! घरात घुसून कुटुंबावर गोळीबार, 14 वर्षाच्या वेदांतला निर्घृणपणे संपवलं

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version