Ganesh Naik On Eknath Shinde : राज्यात महायुती म्हणून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप एकत्र असले तरी, नवी मुंबईत मात्र या दोन्ही पक्षांमधील दरी टोकाला गेल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय वैर आता चव्हाट्यावर आले असून, नाईक यांनी शिंदेंवर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. ‘मला हलक्यात घेऊ नका, नाहीतर तुमचा टांगा पलटी आणि घोडे फरार करेन,’ अशा आक्रमक शब्दांत नाईकांनी शिंदेंना इशारा दिला आहे.
‘भ्रष्टाचाराने तुमचे हात भरलेत’
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना गणेश नाईक म्हणाले की, “माझे हात आणि मन दोन्ही साफ आहे, पण तुमचे हात भ्रष्टाचाराने भरलेले आहेत. ज्या दिवशी हा भ्रष्टाचार उघड होईल, त्यादिवशी तुम्ही तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाही.” सिडकोने शहराच्या विकासाचे भूखंड राज्य सरकारची परवानगी न घेता विकल्याचा गंभीर आरोप करत, ईडीने नवी मुंबई महानगरपालिकेचे ऑडिट करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
14 गावांच्या मुद्द्यावरून संताप
नवी मुंबईत 14 गावांचा समावेश करताना आपल्याला विश्वासात न घेतल्याचा मुद्दा नाईकांनी लावून धरला. “मी तीन वेळा पालकमंत्री राहिलो आहे, माझ्या मतदारसंघात ही गावे येणार आहेत, तरीही मला डावलले गेले. तुम्ही सगळ्यांना हलक्यात घेताय असं वाटतंय, पण उन्माद कराल तर तो उतरवण्याची ताकद माझ्याकडे आहे,” असे नाईक यांनी ठणकावून सांगितले.
हेही वाचा – Nitesh Rane : ‘उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा मुलगा बोलायला लाज वाटते…’; नितेश राणे यांची जहरी टीका
विकासापेक्षा ‘हरामाचा पैसा’ मोठा का?
शहरातील मोकळ्या भूखंडांच्या विक्रीवरून नाईक यांनी थेट हल्ला चढवला. “शहराचा विकास मोठा की यांचा हरामाचा पैसा मोठा? आम्ही कधीही अशा मार्गाने पैसा कमावला नाही,” असे म्हणत त्यांनी शिंदेंवर निशाणा साधला. मी हुकूमशहा असतो तर जनतेने 25 वर्षे निवडून दिले नसते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या वादामुळे नवी मुंबईतील महायुतीमधील वितुष्ट आता निर्णायक वळणावर येऊन ठेपले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.