मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर अखेर विवाहबंधनात अडकली आहे. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला तिचा लग्नसोहळा 8 मे 2026 रोजी अत्यंत पारंपरिक आणि उत्साही वातावरणात पार पडला. ज्ञानदाने तिचा जवळचा मित्र आणि सिनेमॅटोग्राफर हर्षद याच्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली. या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
लग्नासाठी ज्ञानदाने खास मराठमोळा लूक निवडला होता. पारंपरिक नऊवारी साडी, गळ्यातील मंगळसूत्र, नथ आणि साध्या पण देखण्या दागिन्यांमुळे तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसत होतं. दुसरीकडे हर्षदनेही राजेशाही अंदाजातील पारंपरिक पोशाख परिधान करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या दोघांचा साधेपणा आणि पारंपरिकता चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.
ज्ञानदा आणि हर्षद यांच्या लग्नाचे सेलिब्रेशन मागील काही दिवसांपासून सुरू होते. हळद, मेहेंदी आणि केळवणाचे अनेक फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते. विशेष म्हणजे, हर्षदच्या हळदीदरम्यान त्याने आईसोबत केलेला डान्स चाहत्यांना खूपच भावला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला.
लग्नाआधी ज्ञानदासाठी तिच्या मित्रमंडळींनी आणि सहकलाकारांनी खास केळवणाचं आयोजन केलं होतं. ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील कलाकारांनी तिला शुभेच्छा देत नव्या आयुष्यासाठी प्रेमाचा वर्षाव केला. अभिनेत्री सुप्रिया पाठारे आणि नम्रता प्रधान यांच्यासह अनेक कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित होते.
ज्ञानदा आणि हर्षद यांची ओळख तब्बल सात ते आठ वर्षांपूर्वी एका शॉर्ट फिल्मच्या शूटिंगदरम्यान झाली होती. सुरुवातीला मैत्री असलेलं नातं हळूहळू प्रेमात बदललं आणि अखेर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांचा साखरपुडा पार पडला होता.
ज्ञानदाने ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली. आता तिच्या खऱ्या आयुष्यातील या नव्या प्रवासासाठी चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.