नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात रात्री अवकाळी पावसासह गारपीट झाली. गारपीट झाल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. किनवट तालुक्यातील शिवणी, बिलोली तालुक्यातील बडूर, सगरोळी, हिप्परगा तर अर्धापूर तालुक्यात ही गारपीट झाल्याने हरबारा, तुर, ज्वारी पिकांसह भाजीपाल्याचंही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अतिवृष्टीमुळे खरीप गेले आता गारपीटीने रब्बी पिकंही धोक्यात आले आहे. हवामान विभागाने आणखी काही दिवस गारपीट होण्याची शक्यता वर्तवल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
गोंदिया जिल्ह्यात मंगळवारी गारांसह अवकाळी पावसाने आपले रौद्र रुप दाखविल्या नंतर सलग दुसऱ्या दिवशी गोंदिया जिल्ह्याच्या काही भागात गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्याच्या केशोरी गावात गारासह पावसाची नोंद करण्यात आली आहे. जवळपास दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
अमरावतीमध्ये मंगळवारी मोठ्या प्रमाणात गारपिटी झाली. मात्र या गारपिटीमुळे अमरावतीमधील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे उभे पीक जमीनदोस्त झाले असून वेचणीला आलेला कापूस पूर्णपणे भिजून गेला आहे. तसेच फुलोरा अवस्थेत असलेला हरभरा, गहू, कापलेल्या तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.