छत्रपती सांभाजीनगर: "आई वाचवा… आई वाचवा…" या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या किंकाळ्या आणि त्यानंतर घरात पसरलेली भयाण स्मशानशांतता! एका अनैतिक संबंधाची आणि सूडाच्या आगीची इतकी क्रूर परिणती असू शकते, याची कल्पनाही कुणी केली नसेल. छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरात बुधवारी सकाळी एका 38 वर्षीय महिलेची तिच्याच सासूच्या डोळ्यांदेखत निर्घृण हत्या करण्यात आली. अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या गुंतागुंतीने एका हसत्या-खेळत्या कुटुंबाला अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात बुडवले. या घटनेने संपूर्ण शहर हादरले असून, या रक्तरंजित थरारामागील कहाणी एखाद्या क्राईम थ्रिलर चित्रपटालाही लाजवणारी आहे.
घटनेची सुरुवात बुधवारी (22 एप्रिल 2026) सकाळी साडेनऊच्या सुमारास झाली. महेंद्र सोनपेठकर हे कामानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर, 44 वर्षीय आरोपी शैला सुनील सोनार हिने त्यांच्या घरात प्रवेश केला. घरात केवळ महेंद्र यांची वृद्ध आई केशरबाई एकट्याच होत्या. शैलाने महेंद्रची पत्नी साधना हिची विचारपूस केली, तेव्हा ती मंदिरात गेल्याचे तिला समजले. काही वेळाने साधना घरी परतली आणि आपल्या घरात शैलाला पाहून ती संतापली. "तू इथे का आलीस?" या जाब विचारण्यावरून दोघींमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. हा वाद इतक्या विकोपाला गेला की, शैलाने पूर्वनियोजित कटानुसार सोबत आणलेले कुलूप घराला आतून लावून घेतले आणि महेंद्रवरून वाद घालण्यास सुरुवात केली.
यानंतर घरात जो थरार रंगला, तो ऐकून भल्याभल्यांच्या अंगावर काटा येईल. संतापाच्या भरात शैलाने स्वतःच्या पर्समधून थेट पिस्तूल काढले आणि साधनाच्या डोक्याला लावून संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली. या आणीबाणीच्या क्षणी सासू केशरबाई यांनी अफाट धाडस दाखवत शैलाच्या हातावर झडप घातली आणि पिस्तूल हिसकावून खिडकीतून बाहेर फेकले. आपण आता वाचलो, असे केशरबाईंना वाटले होते. मात्र, सूडाने पेटलेल्या शैलाने प्लॅन 'बी' तयार ठेवला होता. तिने पर्समधून एक रासायनिक स्प्रे काढला आणि थेट साधना व केशरबाईंच्या चेहऱ्यावर फवारला. डोळ्यांत प्रचंड जळजळ होऊ लागल्याने साधना खाली कोसळली. याच संधीचा फायदा घेत शैलाने चाकू काढला आणि "बोल आता बोल" असे ओरडत साधनाचा गळा चिरला. पोटावर, मानेवर आणि पाठीवर सपासप वार करत तिने साधनाला रक्ताच्या थारोळ्यात संपवले.
या हत्याकांडातील सर्वात धक्कादायक आणि सुन्न करणारा भाग म्हणजे आरोपी शैलाची मानसिक स्थिती. सासूच्या डोळ्यांसमोर सुनेचा क्रूर अंत केल्यानंतरही शैलाच्या चेहऱ्यावर कसलाही पश्चात्ताप नव्हता. स्वतःला झालेली किरकोळ जखम आणि रक्ताने माखलेले हात तिने शांतपणे बाथरूममध्ये जाऊन धुतले. त्यानंतर जवळपास एक तास ती त्याच घरात, साधनाच्या मृतदेहाजवळ बसून कुणाशी तरी मोबाईलवर बोलत होती. केशरबाईंच्या आरडाओरड्यामुळे शेजारी गोळा झाले, मात्र दरवाजाला आतून कुलूप असल्याने कुणालाच आत जाता आले नाही. अखेर वाळूज एमआयडीसी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलीस दरवाजा तोडत असल्याचे पाहून शैलाने ओढणीच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेण्याचा केवळ एक बनाव रचला, पण तत्पर पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या.
या क्रूर हत्येची पाळेमुळे 2009 सालापर्यंत मागे जातात. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, महेंद्र आणि शैला यांची 2009 पासून ओळख होती. मात्र, हे नाते कालांतराने दुरावले. 2024 मध्ये शैलाने महेंद्रवर लग्नाचे आमिष दाखवून 2011 पासून लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच, महेंद्रला गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन तिने त्याच्याकडून तब्बल 36 लाख रुपये घेतल्याचेही समोर आले आहे. महिन्याभरापूर्वी ती महेंद्रच्या घरात राहायला आली होती. अखेर पैशांची हाव आणि अनैतिक संबंधातील सूडाच्या भावनेने एका निष्पाप महिलेचा बळी घेतला. या संपूर्ण प्रकरणाची पोलीस सखोल चौकशी करत असून, कायद्याच्या कचाट्यातून ही गुन्हेगारी मानसिकता आता सुटणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.