मुंबई महापालिकेतील उपमहापौर निवडीदरम्यान आज राजकीय वातावरण चांगलेच तापले. उपमहापौर संजय शंकर घाडी यांच्या निवडीविरोधात ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी जोरदार निषेध आंदोलन करत सभागृहात ‘50 खोके एकदम ओके’च्या घोषणा दिल्या. या घोषणांमुळे महापालिकेतील कारभार आणि सत्तासंघर्ष पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
आज झालेल्या उपमहापौर निवडीसाठी पालिकेचे ऐतिहासिक महापौर दालन सज्ज झाले होते. महापौरपदासाठी भाजपच्या रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय शंकर घाडी यांची सव्वा वर्षांसाठी निवड जाहीर करण्यात आली. पुढील सव्वा वर्षांसाठी घाडी उपमहापौर म्हणून काम पाहणार आहेत. मात्र, या निवडीला ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शवला.
निवडीची घोषणा होताच ठाकरे समर्थक नगरसेवकांनी सभागृहात घोषणाबाजी सुरू केली. ‘50 खोके एकदम ओके’ अशा घोषणांमधून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट आरोप करत निवडीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या आंदोलनामुळे काही काळ सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ठाकरे गटाच्या नगरसेवकांचे म्हणणे होते की, ही निवड लोकशाही मूल्यांना धरून नाही आणि ती सत्तेच्या जोरावर लादण्यात आली आहे.
दुसरीकडे, संजय घाडी हे अनुभवी राजकारणी मानले जातात. त्यांनी विद्यार्थी चळवळीपासून राजकीय प्रवास सुरू केला असून, विविध पक्षीय जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. 2017ते 2022 या कालावधीत त्यांनी नगरसेवक म्हणून काम केले असून, 2026 मध्ये पुन्हा ते निवडून आले आहेत. शिवसेनेतील महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारीही सध्या त्यांच्याकडे आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.