ठाणे : ठाण्यात मनसेचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला असून राज ठाकरे यांनी राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहामधून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे. मेळाव्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “सरकारला तुम्हाला जातीच्या आणि धर्माच्या वादात गुंतवून ठेवायचे आहे. तुम्ही या वादात गुंतून राहिलात तर दुसरे प्रश्न विचारणार नाहीत. आज देशामध्ये बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक झाले असून देशाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. आता १४ तारखेला गणपती येत आहेत, मला सर्वाधिक हीच भीती आहे की गणपतीदरम्यान दंगली घडवण्यात येतील. फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात, जेणेकरून तुम्ही तेवढ्याच गोष्टीत अडकून राहिले पाहिजेत आणि बाकी सर्व गोष्टींकडे तुमचे दुर्लक्ष झाले पाहिजे.”
मुंबईमध्ये त्याची एक झलक पाहिली असून ही सुरुवात असल्याचे सांगत राज ठाकरे म्हणाले, “जो सुजाण हिंदू आहे आणि जो सुजाण मुसलमान आहे, मला त्या दोघांनाही सांगायचे आहे. सतर्क राहा, हकनाक आपली मुले यात जातील आणि आपले सगळे लक्ष तिकडेच जाईल. एकमेकांमध्ये भांडणे लावणे आणि त्यात तुम्हाला गुंतवून ठेवणे, एवढाच कार्यक्रम सध्या सुरू आहे.” दरम्यान, राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते या मेळाव्यासाठी जमले होते. यात राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला. मनसेची सध्या पक्षबांधणी सुरू असून गेल्या महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सदस्य नोंदणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.