Rupali Chakankar: अशोक खरात प्रकरण आता केवळ गुन्हेगारी चौकटीपुरते मर्यादित न राहता आर्थिक आणि राजकीय स्तरावरही मोठे वळण घेतले आहे. तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या प्रकरणाशी संबंधित नवे पैलू समोर येत आहेत. विशेष तपास पथकाने (SIT) आता खरातशी निगडित विविध संस्था आणि व्यक्तींच्या व्यवहारांचा सखोल तपास सुरू केला आहे.
तपासादरम्यान आकाश चौधरी या व्यक्तीच्या व्यावसायिक जाळ्याकडेही लक्ष वेधले गेले आहे. विविध क्षेत्रांमध्ये विस्तारलेल्या त्यांच्या कंपन्यांमुळे आर्थिक व्यवहारांची गुंतागुंत वाढली असल्याचे दिसते. पर्यटन, हॉस्पिटॅलिटी आणि ॲडव्हेंचर क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक कंपन्यांची नोंद त्यांच्या नावावर असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या कंपन्यांमधील आर्थिक हालचाली आणि त्यांचे परस्परसंबंध तपासण्याचे काम सुरू आहे.
खरातशी संबंधित शिवनिका ट्रस्ट हा तपासाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या संस्थेच्या आर्थिक व्यवहारांबाबत संशय व्यक्त होत असल्याने SIT कडून सर्व कागदपत्रांची छाननी केली जात आहे. ट्रस्टच्या आजी-माजी विश्वस्तांना चौकशीसाठी समन्स बजावले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या पार्श्वभूमीवर काही प्रमुख राजकीय व्यक्तींचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रुपाली चाकणकर यांचे नावही या प्रकरणात पुढे आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खरातशी असलेल्या ओळखीमुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून, त्यांच्या अडचणीत भर पडत असल्याचे दिसत आहे. याआधी त्यांनी काही महत्त्वाच्या पदांचा राजीनामा दिला असला, तरी तपासाचा फेरा अद्याप कायम आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पुण्यात आज सकाळी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून, चाकणकरांविरोधात जोरदार निदर्शने होण्याची शक्यता आहे. या आंदोलनामुळे वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.
खरात प्रकरणाचा तपास आता अधिक व्यापक स्वरूप धारण करत असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपास यंत्रणांची नजर सध्या संबंधित सर्व व्यक्ती आणि संस्थांवर असून, या प्रकरणाचा शेवट काय होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.