महाराष्ट्रात MPSC परीक्षेतील पेपरफुटीच्या मुद्द्यावरून तरुणाईचा आक्रोश आता रस्त्यावर उतरला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सरकारला जाब विचारण्यासाठी आंदोलनाचं हत्यार उपसलंय. काल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढत जोरदार हल्लाबोल केला. यावेळी पेपरफुटीच्या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करावी, परीक्षेतील पारदर्शकता कायम ठेवावी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत सरकारने ठोस भूमिका जाहीर करावी, तसेच एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनामा घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. याचपार्श्वभूमीवर एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावर अध्यक्ष विवेक भीमनवार यांचे स्पष्टीकरण समोर आले आहे. माझ्याविरोधात एक तरी पुरावा दाखवा मी क्षणार्धात पदाचा राजीनामा देईन असं म्हणत एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावर अध्यक्ष विवेक भीमनवार म्हणाले की, “माझ्याविरोधात कुणी एक जरी पुरावा दिला, तर एक क्षणसुद्धा मी या पदावर राहणार नाही, औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीचा घटनाक्रम माझ्या रुजू होण्यापूर्वीचा होता. तक्रार प्राप्त होताच आयोगाकडून पोलिसांत तक्रार दाखल घेण्यात आली असून तपास सुरू आहे. पेपरफुटीच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी एमपीएससीकडून उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्य सरकारनेही उच्चाधिकार समिती गठीत केली असून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी सल्लामसलत सुरू केले आहे.“
“वस्तुस्थिती स्पष्ट करुनही सातत्याने माझ्याविरोधात वैयक्तिक आणि प्रतिमा मलिन करणारे राजकीय आरोप होत असल्याने मी अत्यंत व्यथित आहे. पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून एमपीएससीमध्ये अनेक गुणात्मक आणि रचनात्मक सुधारणा केल्या. स्पर्धा परीक्षांच्या 8 आणि सरळसेवा भरतीच्या 76 चाळणी परीक्षा अशा एकूण 84 परीक्षा यशस्वीपणे घेतल्या.“
“शासनाकडून मागणी होण्यापासून ते निकाल जाहीर होईस्तोवर अनेक गुणात्मक आणि रचनात्मक सुधारणा केल्या. यामुळे 18 ते 21 दिवसांत निकाल जाहीर करणे शक्य झाले. निकाल जाहीर होण्यातील प्रदीर्घ विलंब कमी केला आणि एक महिन्यात निकाल जाहीर करता येईल, असे नियोजन केले आहे. अजूनही बर्याच सुधारणा नियोजनाच्या पातळीवर आहेत. उद्देश हाच की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिष्ठा अबाधित रहावी आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करणार्या विद्यार्थ्यांना यथोचित न्याय मिळावा, त्यांच्या कष्टाचे चीज व्हावे. पारदर्शी आणि निष्पक्ष अशीच व्यवस्था उभारण्याचा मी प्रयत्न सातत्याने करतो आहे आणि करीत राहीन.”
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.