मुंबई : दिशा सालियान प्रकरणात नव्या घडामोडी समोर आल्या आहेत. दिशा सालियान यांचे वडील सतीश सालियान यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांना 500 कोटी रुपयांची मानहानी नोटीस पाठवली होती. आता या नोटिशीला आदित्य ठाकरे यांनी आपल्या वकिलांमार्फत सविस्तर उत्तर देत नोटिशीतील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरेंकडून सतीश सालियान यांच्या कायदेशीर नोटिशीला 25 पानी उत्तर पाठवण्यात आले आहे. या उत्तरात नोटिशीतील आरोप तथ्यहीन असल्याचे म्हटले असून, आपल्यावर करण्यात आलेले दावे स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला आहे.
सोशल मीडिया पोस्टबाबतही स्पष्टीकरण
कायदेशीर उत्तरात 16 सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या सोशल मीडिया पोस्टचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्या पोस्टमध्ये सतीश सालियान यांचे नाव कुठेही नमूद करण्यात आलेले नसल्याचा दावा आदित्य ठाकरेंकडून करण्यात आला आहे. तसेच पोस्टमधील कोणतेही विधान विशिष्टपणे सतीश सालियान यांच्याकडे निर्देश करत नसल्याचेही उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे.
निष्पक्ष चौकशीची मागणी
या प्रकरणातील आरोपांवर संबंधित यंत्रणांकडून निष्पक्ष आणि अधिकृत चौकशी होणे आवश्यक असल्याचे मतही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. सत्य समोर यावे आणि तपास कोणत्याही दबावाशिवाय पार पडावा, अशी भूमिका त्यांनी आपल्या उत्तरातून मांडली आहे.
याशिवाय, सतीश सालियान यांची बदनामी करण्याचा कोणताही हेतू नसल्याचेही आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी स्पष्ट केले आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
दिशा सालियान प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आल्यानंतर सतीश सालियान यांनी आदित्य ठाकरे आणि इतर काही व्यक्तींविरोधात गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी 500 कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस पाठवली होती. या नोटिशीला उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी सर्व आरोप नाकारले असून, त्यांना कोणताही तथ्याधार नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकरणाकडे राज्याच्या राजकीय आणि कायदेशीर वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पुढील काळात या नोटिशीच्या पार्श्वभूमीवर कायदेशीर प्रक्रिया कोणत्या दिशेने पुढे सरकते, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.