मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौर बंगल्याचे नूतनीवर झाल्यानंतर आता एकदा त्यांच्या होणाऱ्या खर्चावरून राजकारण तापले आहे. गेल्या 25 वर्षांपासून देशातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता होती. मात्र नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच मुंबई पालिकेवर भाजपचा महापौर बसवण्यात आला. तर रितू तावडे यांच्याकडे महापौरपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. दरम्यान, महापौर बंगल्यावर होणाऱ्या खर्चावरून शिवसेना उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केली असून मुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी करण्यासाठी महापालिका जिंकली असल्याची खोचक टीका केली. त्यांनी एक्स पोस्टद्वारे भापज महापौरांच्या मनमानी कारभारावर निशाणा साधला. तर महापौरांकडूनही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हटले आहे आदित्य ठाकरेंनी
आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावरून भाजपवर निशाणा साधला आहे. महापालिकेच्या पैशांची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजपच्या महापौरांच्या मनमानीसाठी मुंबईकरांचा पैसा खर्च केला जात असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आधीच नूतनीकरण झालेल्या ठिकाणी पुन्हा सुशोभीकरण आणि तुलनेने शांत परिसरात ध्वनिरोधक भिंती उभारण्यावर खर्च केला जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर महापौर आणि काही जणांना सध्याच्या गाडीतून मुंबईच्या रस्त्यांवर प्रवास करताना अस्वस्थ वाटत असल्याने नव्या गाडीची मागणीही करण्यात आल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. एकीकडे मुंबईच्या मोकळ्या जागा खासगी हातात सोपवल्या जात असताना दुसरीकडे महापालिकेच्या पैशांची उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप करत, ‘भाजपला मुंबई महापालिका का जिंकायची होती, याचं हेच कारण आहे,’ असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
Kharche pe Charcha! The @mybmc is spending Mumbaikar’s money for the whims of the bjp mayor.
Apart from a renovation already, another facelift and sound barriers in a relatively quiet area in Mumbai! Apart from this, ofcourse the new car demand since apparently she and a few… pic.twitter.com/f28qFlBPDF — Aaditya Thackeray (@AUThackeray) August 5, 2026
याप्रकरणी महापौरांनी स्पष्टीकरण दिले असून त्या मंत्रालयातही याविषयी बोलणार असल्याचे समजते. त्या निविदेशी महापौरांचा अथवा महापौर निवासस्थानाचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. त्यांनी नमूद केले की, मुंबईच्या महापौरांचे निवासस्थानाशी निगडित विविध सेवा सुविधासाठी नव्याने निविदा प्रसारित करण्यात आल्याचे वृत्त विविध प्रसारमाध्यमांतून प्रसारित करण्यात आले आहेत. याबाबत पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण करण्यात येत आहे. मुंबईच्या महापौरांचे निवासस्थान हे वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय परिसरात आहे. संपूर्ण उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील देखरेख, दुरुस्ती, परिरक्षण विषयक कामे संबंधित उद्यान आणि प्राणिसंग्रहालय विभागाकडून हाती घेतली जातात.
महापौर निवासस्थान हे हेरिटेज प्रकारातील असून त्याच्याशी निगडित कामे हेरिटेज मेंटेनन्स विभाकडून केली जातात. ही निविदा मेंटेनन्स विभागाने काढलेली नाही, हे ठळकपणे नमूद करण्यात येत आहे. सबब, हे स्पष्ट करण्यात येते की, संबंधित निविदा आणि त्यामध्ये नमूद कामे ही महापौर निवासस्थानात नव्हे तर आजुबाजूच्या आणि एकूणच प्राणिसंग्रहालय परिसरातील आहेत. महापौरांना या निविदेविषयी काहीही माहिती नाही अथवा माहीत असायचे कारण नाही. तसेच, महापौरांनी या कामांची विनंती केलेली नाही. प्रस्तावित कामे ही महापौर बंगल्याच्या आतील नाहीत, हे विशेषत्वाने नमूद करण्यात येत आहे. ज्या खात्याने आणि अधिकाऱ्यांनी ही संपूर्ण निविदा प्रक्रिया हाताळली आहे, त्यांना ह्या कामांची निकड, त्याबाबतची प्रशासकीय प्रक्रिया आदी संपूर्ण माहिती आहे. त्यामुळे कृपया या निविदा प्रक्रियेशी, त्यातील कामाशी महापौरांचा ओढूनताणून संबंध जोडू नये, ही विनंती करण्यात येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.