दोन्ही राष्ट्रवादीत सध्या चलबिचल पाहायला मिळत आहे. अशातच ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात बुधवारी 19 ऑगस्ट रोजी रात्री 8.15 वाजता शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीचं मुळ कारण अद्याप समोर आलेलं नसलं तरी सध्याची स्थिती पाहून ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यातील बैठकीनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
पार्थ पवार बुधवारी रात्री सिल्व्हर ओकवर आले होते, त्यानंतर त्यांची आणि शरद पवार यांची बैठक पार पडली. ही बैठक पार पडल्यानंतर रात्री 11.15 वाजता ते सिल्व्हर ओकवरून बाहेर पडले. त्यामुळे तब्बल तीन तास शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये बंद दाराआड खलबतं सुरु असल्याचे समोर आले आहे. दोघांमध्ये राज्यातील राजकीय परिस्थिती आणि विकासाच्या प्रकल्पांसह विविध विषयावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं.
मोदी मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून पार्थ पवार यांचं नाव सर्वात आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे. शरद पवार आणि पार्थ पवार यांच्या बैठकीत त्या अनुषंगानेही चर्चा झाली असावी अशी शक्यता आहे. दरम्यान या भेटीतील तपशील राष्ट्रवादीकडून देण्यात आलेला नाही. मात्र, अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
बारामतीमधील समस्यांवर चर्चा?
नुकतचं बारामतीकरांनी संपूर्ण पवार कुटुंबीयांना बारामतीमधील विविध समस्यांवर सोशल मीडियाद्वारे एक पत्र पाठवलं होत. या पत्रात शरद पवारांसह सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार आणि जय पवार यांच्या नावाचा समावेश होता. या पत्राद्वारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील आकस्मित निधनानंतर बारामतीतील राजकारण तसेच पवार कुटुंबीयातील सध्या सुरु असलेल्या चर्चांचा परिणाम बारामतीतील सर्वसामान्यांवर होत असल्याची व्यथा बारामतीकरांनी मांडली.
इतकचं नव्हे तर बारामतीकरांनी पवार कुटुंबीयांना अजित पवारांनंतर बारामती पोरकी झाली अशी व्यथा मांडत बारामतीमधील विविध समस्यांवर सोशल मीडियाद्वारे एक पत्र पाठवलं. बारामतीमध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. पवार कुटुंबातील सर्व मान्यवरांनी बारामतीतील सामान्य जनतेच्या समस्या, नगरपरिषदेचा कारभार, वाढती गुन्हेगारी आणि प्रशासनातील मनमानी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. असं आवाहन केलं होत. त्यानुषंगानेही या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.