ज्या ठिकाणी गावातील पिढ्यानपिढ्या मुले शिकली, त्या जिल्हा परिषद शाळेच्या शासकीय जागेची बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यातील गळनिंब येथे उघडकीस आला आहे. न्यायालयाच्या आदेशाने या प्रकरणात पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- Thane Municipal Corporation Mayor : 'महायुती म्हणून एकत्र लढलोय…प्रमुख पदांसाठी नक्कीच शिवसेनेसोबत चर्चा करून मार्ग काढू'; महापौरपदाबाबत भाजप नेत्याचं वक्तव्य
श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे जिल्हा परिषदेची "मराठी मुलांची शाळा" होती. 1971-72 सालच्या उताऱ्यावरही तशी स्पष्ट नोंद होती. कालांतराने शाळेला जागा अपुरी पडत असल्याने रस्त्याच्या पलीकडे मोठ्या जागेत शाळा स्थलांतर करण्यात आली. मात्र काही लोकांनी 1997 साली तत्कालीन ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना हाताशी धरून पूर्वीची शाळेची जागा खाजगी मिळकत दाखवून परस्पर विकली. तत्कालीन परिस्थितीत ज्या जागेचा बाजारभाव 5 लाख रुपयांहून अधिक होता, ती जागा अवघ्या 41 हजार रुपयांना विकण्यात आली. विशेष म्हणजे हा पैसा सरकारी तिजोरीत न भरता संबंधितांनी आपापसात वाटून घेतला.
2015 साली हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर तक्रारदार अशोक बाहुले यांनी विविध प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा केला, मात्र त्यांना कुठेही दाद मिळाली नाही. अखेर त्यांनी 2019 साली न्यायालयात धाव घेत कागदोपत्री पुराव्यांसह झालेला अपहार न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. आता 2026 मध्ये बाहुले यांच्या न्यायालयीन लढ्याला यश आले असून ताराबाई शिंदे, चांगदेव भागवत, हनुमंत चिंधे, जिजाबा वडितके आणि दगडू शिंदे यांच्यावर शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषद शाळेची जागा विकणाऱ्यांवर तब्बल 29 वर्षांनंतर गुन्हा दाखल झाला आहे. आता या प्रकरणात दोषींविरोधात कोणत्या प्रकारची कारवाई होते? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.