आज पुण्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रम पार पडणार आहे, या कार्यक्रमात राहुल गांधी युवकांशी संवाद साधणार आहेत. मात्र त्यापूर्वीच भाजपाची विद्यार्थी संघटना अभाविप आणि काँग्रेसचे युवक संघटन एनएसयुआय यांच्यात सीओईपी कॉलेजच्या परिसरात जोरदार बाचाबाची पाहायला मिळाली. यावेळी कॉंग्रेस नेते विजय वडेट्टिवार देखील घटनास्थळी दाखल झाले होते. अभाविप संघटनेच्या लोकांनी आम्हाला मारहाण केल्याचा आरोप एनएसयुआयने केला आहे.
तर अभाविप संघटनेने काँग्रेस विद्यार्थ्यांकडून फी संदर्भात चुकीचे वदवून घेत घाणेरडे राजकारण करत असल्याच्या कारणावरून हा वाद झाला. दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने पुण्यातील सीओईपी कॉलेज बाहेर कार्यकर्त्यांमध्ये मोठी राडा झाला. दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी दोन्ही गटाच्या हा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करत होते. एबीव्हीपीचे काही कार्यकर्ते सीओईपी कॉलेजच्या परिसरात आले आणि त्यांनी या ठिकाणच्या तरुणांना राहुल गांधींच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याबाबत धमकावत असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला.
हेही वाचा- Dumper Stuck in Pothole Nashik: नाशिकमध्ये रस्ता खचला; खडीने भरलेला डंपर थेट 10 ते 12 फूट खोल खड्ड्यात कोसळला
या गोंधळानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात येथे जमल्याने दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी आणि आरोप प्रत्योराप सुरु झाले आणि परिस्थिती अधिकच चिघळल्याचं दिसून आलं. 10.45 वाजल्याच्या सुमारास हे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले परंतु परिस्थिती हाता बाहेर गेल्याचे चित्र निर्माण झाले होते. सीओपी हॉस्टेलमध्ये झालेल्या राड्या प्रकरणी काँग्रेसच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण केली व तेथली शांतता भंग केली याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पुष्कर आबनावे, भूषण राणभरे, अक्षय जैन, सौरभ आमराळे, सागर धाडवे, प्रथमेश आबनावे आणि त्यांच्यासोबत हजर असणारे एनएसयुआय व युवक काँग्रेसचे 50 ते 60 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि सीओईपीचे कुलगुरू उपस्थित होते. त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती दिली त्यानुसार शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.