नवनाथ बोरकर, प्रतिनिधी
बारामती : बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. हा कारखाना सध्या दिवंगत नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू होता. आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कारखाना सुरु आहे. या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढवली जाणार असल्याचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे. शेतकरी पॅनलच्या माध्यमातून सोमेश्वर कारखान्याची निवडणूक ताकतीने लढवणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितले आहे. यामुळे आता सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार असा थेट कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सामना होणार आहे.
काय म्हणाले युगेंद्र पवार
निवडणुकीबाबत शरदचंद्र पवार पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली की, पवारसाहेबांचे मार्गदर्शन आणि अजितदादांच्या कष्टामुळे सोमेश्वर कारखाना चांगल्या पद्धतीने चालला. अजितदादांचा कारखान्यावर वचक होता. गैरप्रकार आढळल्यास तातडीने कारवाई आणि चौकशी केली जात होती. अजितदादा नसले तरी पवारसाहेबांनी कारखान्याकडे लक्ष द्यावे, अशी सभासदांची इच्छा आहे. त्यामुळे पवारसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आमच्या पक्षाच्या माध्यमातून लढवली जाणार आहे. माळेगाव कारखान्यातील डिस्टिलरी बंद असल्यासारख्या अडचणी निर्माण झाल्या. माळेगांव कारखान्यात प्रशासक नेमण्याची वेळ येत असेल तर सभासदांनी निवडून दिलेल्या संचालकांची भूमिका काय. संचालक मंडळावर प्रभावी वचक आणि योग्य देखरेख असणे गरजेचे आहे. पवारसाहेबांना सहकार आणि साखर कारखानदारीचा मोठा अनुभव आहे. पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वर कारखान्यासाठी शेतकरी पॅनल उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पॅनलमध्ये उच्चशिक्षित, तरुण, ज्येष्ठ आणि अनुभवी उमेदवारांचा समावेश केला जाणार आहे. स्वच्छ प्रतिमेचे आणि सभासदांच्या प्रश्नांसाठी काम करणारे उमेदवार देण्याचा दावा यावेळी युगेंद्र पवार यांनी केला. मागील 10-15 वर्षांपासून काही ठिकाणी 30 वर्षांपासून तेच लोक संचालक असल्याचा आरोपही त्यांनी केला. तरुण सभासदांना आणि नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा पॅनलचा प्रयत्न आहे. ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आणि कारखाना कामगारांचे हित केंद्रस्थानी ठेवण्याचा दावा त्यांनी यावेळी केला. विद्यमान संचालक मंडळात बदल होणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.