भिवंडी : कल्याण शहरात मदत करण्याच्या बहाण्याने पीडित तरुणीला आपल्या कार्यालयात बोलावून तिला भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार तसेच बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्या विरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुरुवारी पहाटे शस्त्राचा धाक दाखवून दारू पाजून सामूहिक शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारी वरून पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
22 वर्षांच्या पीडित विवाहित तरुणी हिचा पतीसोबत वाद असल्याने त्या वादात मध्यस्ती करण्यासाठी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी तरुणीला आपल्या कार्यालयात बोलावले होते. त्यानंतर 13 सप्टेंबर रोजी माजी आमदार नरेंद्र पवार आणि त्यांचा साथीदार बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांनी तिला भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे आपल्या खासगी मालमत्ता येथे घेऊन येत तिला शस्त्राचा धाक दाखवून दारू पाजून तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. रात्री दोन वाजता माजी आमदार नरेंद्र पवार तेथून निघून गेल्यानंतर शैलेश पाटील याने सुद्धा या पीडित तरुणीवर अत्याचार केल्यानंतर पहाटे चार वाजता शैलेश पाटील याने तरुणीला तिच्या घरी आणून सोडले. घाबरलेल्या तरुणीने 16 सप्टेंबर रोजी काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांच्याकडे मदत मागितली. तेव्हा तरुणीने आपल्यावर भाजप माजी आमदार नरेंद्र पवार व बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील याने अत्याचार केल्याचे व त्यासंबंधी आपल्याकडे व्हिडीओ व मोबाईल व्हॉट्सॲप चॅट असल्याचे दाखविले. त्यानंतर तरुणीला घेऊन रात्री कांचन कुलकर्णी पडघा पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. तेथे पहाटे माजी आमदार नरेंद्र पवार व शैलेश पाटील या दोघांविरोधात सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मला आता न्याय द्यावा. यांनी अशा पद्धतीने किती महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले असेल. त्यामुळे यांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी पीडित तरुणीने केली आहे.
पीडित तरुणीने माझ्या इंस्टाग्राम अकाऊंडवरील मोबाईलवर संपर्क साधून मदत मागितली. मी तिला भेटले असता तिने जी घृणास्पद हकीकत सांगितली ती ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या जवळील व्हिडिओ व मोबाईल चॅट बघितल्यानंतर मी तत्काळ पीडित तरुणीला घेऊन रात्री पडघा पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना रात्री संपर्क केल्यानंतर त्यांनी पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिर यांनी रात्री उशिरा सर्व खातरजमा करून शस्त्राचा धाक दाखवून सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. परंतु ही घटना अत्यंत निंदनीय काळिमा फासणारी असून देशात आणि राज्यात लाडकी बहीण म्हणून डांगोरा पिटणाऱ्या भाजपचा माजी आमदार अशा पद्धतीने कृत्य करीत असेल तर त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. तर शैलेश पाटील हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर परदेशी महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी तर स्वतःच्या आईला शस्त्राचा धाक दाखवून तिच्या नावे असलेली जमीन आपल्या नावे करून बळकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे या दोन्ही आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. यांना 48 तासात अटक न झाल्यास हजारो महिलांना सोबत घेऊन पडघा पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करू, असा इशारा काँग्रेस नगरसेविका गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी दिला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.