योगेश बांडागळे, प्रतिनिधी
रत्नागिरी : ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने आज, गणेश चतुर्थीच्या दिवशी अवघा कोकण दुमदुमून गेला आहे. गणेश चतुर्थीच्या मंगलमय मुहूर्तावर लाडक्या गणरायाचे घरोघरी आगमन होत असून, भक्तांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत आहे. कुठे ढोल-ताशांचा गजर, कुठे टाळ-मृदंगाचा निनाद, तर कुठे पारंपरिक वाद्यांच्या साथीने बाप्पाचे भक्तिमय स्वागत केले जात आहे. श्रद्धा आणि भक्तीच्या या वातावरणात रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील परचुरी गावात गणपती आगमनाची अनोखी परंपराही पाहायला मिळत आहे. येथे महिला डोक्यावर गणपतीची मूर्ती घेऊन बाप्पाला घरी आणतात. अनेक वर्षांपासून जपली जाणारी ही परंपरा यंदाही मोठ्या भक्तिभावाने पार पडत आहे. कोकणच्या मातीत रुजलेली श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा हा अनोखा संगम पाहायला मिळत आहे.
भातशेतीच्या बांधावरून डोक्यावर गणरायाचे आगमन; करजुवेत पारंपरिक पद्धतीने बाप्पाचे स्वागत!
रत्नागिरी जिल्ह्यातही घरोघरी वाजत-गाजत लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे. कोकणच्या ग्रामीण भागात मात्र बाप्पाच्या आगमनाची अनोखी आणि पारंपरिक पद्धत आजही जपली जाते. मूर्तीशाळेतून आणलेल्या गणरायाला भक्त डोक्यावर घेऊन भातशेतीच्या बांधावरून, हिरव्यागार शेतातून ढोल-ताशांच्या गजरात घरी घेऊन जातात. संगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावातही अशीच भक्तिमय आणि पारंपरिक परंपरा पाहायला मिळाली. डोक्यावर गणरायाची मूर्ती, सोबत ढोल-ताशांचा गजर आणि चहुबाजूंनी हिरवाई…, अशा भक्तिमय वातावरणात करजुवेकरांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे उत्साहात स्वागत केले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.