मुंबई: गणेशोत्सवापासून सणासुदीचा हंगाम सुरु होतो. परंतु ऐन सणासुदीत साखरेचे भाव गगनाला भिडल्याने नागरिकांची चिंता वाढली होती. सरकारच्या एका तरतुदीमुळे साखरेचे दर कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे गृहिंणीसोबतच मिठाई व्यावसायिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या निर्णयानुसार व्यापारांच्या साठेबाजी व सट्टेबाजी यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात गगनाला भिडलेले साखरेचे भाव आता नियंत्रित होण्याची शक्यता आहे.
आताची परिस्थिती काय आहे?
गेल्या महिन्यात साखरेच्या भावात तब्बल 40 टक्क्यांनी वाढ झाली होते. मात्र सरकारच्या तरतुदींमुळे साखर कारखान्यांमधील दरात 20 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.
काय आहे निर्णय ?
साखर व्यापाऱ्यांसाठी साठा मर्यादा 4,000 क्विंटलवरून 2,000 क्विंटलपर्यंत कमी करण्यात आली आहे. हा निर्णय 15 सप्टेंबर 2026 पासून 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत लागू राहील. तसेच व्यापाऱ्यांना साखर मिळाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही.
आता काय बदल होणार ?
केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यासाठी देशांतर्गत बाजारात तब्बल 13 लाख टन साखरेचा अतिरिक्त कोटा मंजूर केला आहे. यामुळे नवी मुंबईतील घाऊक बाजारात साखरेचे भाव प्रति किलो दर 49 ते 51 रुपयांवर आले आहेत. तसेच घाऊक बाजारात साखरेचे दर किलोमागे 9 ते 11 रुपयांनी कमी झाले आहेत.
पुरवठा साखळीतून साखरेची वाहतूक सुरळीत होईल आणि ग्राहकांना कमी दरात साखर मिळेल, हा या निर्णयाचा उद्देश आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.