राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग लावली आहे. राज्यातील विविध भागांत पावसाचा जोर कायम असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. अशातच आज रविवारी कोकणासह पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर मुसळधार पाऊसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. राज्यातील काही ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज मुंबईसह नवी मुंबई, पालघर आणि ठाण्यात पावसाच्या मध्यम सरी बरण्याची शक्यता आहे. तर कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात यलो अलर्ट जारी करत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.
यावेळी पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये कुठलाही अलर्ट जारी करण्यात आलेला नसला तरी हलक्या पावसाची शक्यता आहे.
विदर्भातील भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळमध्ये कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. दरम्यान पुढील काही दिवस पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.