पाणी हे जीवन आहे असे आपण नेहमी ऐकत आलो, मात्र आता हेच क्षारयुक्त पाणी लोकांचं मरण बनत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये क्षारयुक्त पाण्याने किडनीचे आजार होऊन आतापर्यंत हजारो जणांचे जीव गेले आहेत. असे असताना सरकारने क्षारयुक्त पाण्याने बाधित १४० गावांना “१४० गाव पाणीपुरवठा योजना” राबवली. त्यामुळे क्षारयुक्त पाणी पिणाऱ्या किडनीग्रस्त गावांना थोडासा आधार मिळाला. मात्र आता पुन्हा एकदा या १४० गावांपैकी तब्बल ६० गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. पाणीपुरवठा विभागाला संबंधित ग्रामपंचायतीकडून पाणीपट्टी वेळीच भरली नसल्यामुळे हा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असल्याचं प्रशासकीय अधिकारी सांगतायेत. मात्र या गावातील गावकऱ्यांना गावातील पाणीपुरवठा बंद झाल्याने पुन्हा एकदा क्षारयुक्त विषारी पाणी प्यावं लागतंय.
क्षारयुक्त पाणी प्यावं लागू नये म्हणून महिला – पुरुष आपला कामधंदा सोडून शुद्ध पाण्याच्या शोधात भटकंती करताना पाहायला मिळत आहेत. अनेक जण स्वच्छ पाणी मिळावं म्हणून फुटलेल्या वॉल्वचा सहारा घेत आहेत. दिवस-रात्र या फुटलेल्या वॉल्ववर पाण्यासाठी लोकांची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळतय..
गावकऱ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावं म्हणून बंद केलेला पाणीपुरवठा तात्काळ सुरू करावा यासाठी विविध सामाजिक संघटना पुढे आल्या आहेत. त्यांनी पाणीपुरवठा विभागाला तात्काळ गावकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी पाणीपुरवठा सुरू करावा अशी मागणी केली. मात्र येथील नतद्रष्ट अधिकारी काहीही ऐकायला तयार नाहीत. एकूणच पाणीपुरवठा योजना राबवणारे अधिकारीच आता खारपणपट्ट्यातील या गावकऱ्यांच्या जीवावर उठले की काय ? अशी परिस्थिती साठ गावातील पाणीपुरवठा बंद केल्याने निर्माण झाली आहे.
६० गावातील पाणीपुरवठा बंद करून या गावकऱ्यांना मरणाच्या खाईत पाणीपुरवठा विभाग लोटत आहे.. त्यामुळे मायबाप सरकार विषारी पाणी पिण्याची या गावकऱ्यांवर वेळ येऊ नये एवढीच माफक अपेक्षा आहे..
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.