NEET Paper Leak Case: NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता पुण्यापर्यंत पोहोचले आहेत. पुणे पोलिसांनी या घोटाळ्यात सहभागी असल्याच्या संशयावरून बिबडेवाडी परिसरातील मनीषा वाघमारे (46) या महिलेला पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले आहे. ही महिला पुण्यात ब्युटी पार्लर चालवत असून, ती पेपरफुटीतील मुख्य आरोपींच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे.
नेमकी भूमिका काय?
तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेली मनीषा वाघमारे ही मुख्य आरोपी धनंजय लोखंडे याच्या मदतीने रॅकेट चालवत होती. विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना मुख्य आरोपींपर्यंत पोहोचवण्याचे काम ती करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. तिच्याकडून पोलिसांनी एक लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केला असून, यामध्ये धनंजय लोखंडेसोबत झालेले व्हॉट्सअॅप चॅट्स आणि कॉल्सचे महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत.
अहिल्यानगर कनेक्शन आणि आर्थिक गैरव्यवहार
दरम्यान, अहिल्यानगरमधून अटक झालेला धनंजय लोखंडे आणि नाशिकचा संशयित शुभम खैरनार यांनी हा कट रचल्याची माहिती समोर येत आहे. धनंजयने हा पेपर शुभमला 10 लाख रुपयांना विकला होता, तर शुभमने तो पुढे टेलिग्रामच्या माध्यमातून 15 लाख रुपयांना विकल्याचा आरोप आहे. पुणे पोलीस आज सायंकाळपर्यंत मनीषा वाघमारेचा ताबा सीबीआयकडे (CBI) सोपवणार आहेत.
पोलिसांची कारवाई आणि पुढील तपास
नाशिकचा संशयित शुभम खैरनार याला सीबीआयने आधीच ताब्यात घेऊन मुंबईला नेले आहे. पुणे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी माहिती दिली की, तपासासाठी विशेष पथके तयार करण्यात आली होती, ज्यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे मनीषाला अटक केली. हे रॅकेट केवळ महाराष्ट्रच नव्हे तर हरियाणा, राजस्थान आणि तेलंगणापर्यंत पसरल्याचा संशय असून सीबीआय सर्व राज्यांमध्ये एकाच वेळी तपास करत आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या रॅकेटमध्ये अजून किती बडे मासे अडकणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.