पुणे : आदिवासी वसतिगृहातील समस्यांबाबत विद्यार्थी गेल्या 13 दिवसांपासून पुण्यातील मांजरी येथे उपोषणाला बसले आहेत. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली आहे. आज, मंगळवारी काँग्रेससह विविध पक्षांचे नेते या उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, पुण्यातील आदिवासी वसतिगृहात उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्याची प्रकृती खालावली असून त्याला सहकाऱ्यांनी तात्काळ रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेनंतर उपोषणकर्ते विद्यार्थी अजूनच आक्रमक झाले. सरकारविरोधात विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर दुसरीकडे आणखी एका विद्यार्थ्याची डॉक्टरांकडून तपासणी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. प्रकृतीनुसार त्यालाही लवकरच रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. या विद्यार्थ्यांशी खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील फोनद्वारे संपर्क साधला असून विद्यार्थ्यांनी आंदोलन, उपोषण सुरूच ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे.
हेही वाचा : मोठी बातमी! साखरेच्या दरात मोठी घसरण; क्विंटलमागे तब्बल 700 ते 800 रुपयांची कपात
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.