फलटण : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात भरधाव वेगाने धावणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारचा भीषण अपघात होऊन तिघा तरुणांचा जागीच मृत्यू, तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वाठार-निंबाळकर हद्दीत कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहन रस्त्यालगतच्या नाल्यावरील कठड्याला जोरात धडकून पलटी झाले. अपघातावेळी कारमध्ये एकूण सहा जण प्रवास करत होते. या अपघातात मोहम्मद हुसेन (रा. अयोध्या, उत्तर प्रदेश), अनिल हेब्रम (रा. जमशेदपूर, झारखंड) आणि मदानंद पुर्ती (रा. जमशेदपूर, झारखंड) यांचा जागीच मृत्यू झाला.
तर कृष्णकुमार (तक्रारदार) यांना डोके व पाठीला दुखापत झाली असून, सौरभ कुमार (रा. झारखंड) यांना पुढील उपचारासाठी बारामती येथे हलविण्यात आले आहे. तसेच एम. डी. मितारे (रा. बिहार) यांच्यावर फलटण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार तक्रारदाराने आपली कार मित्र मोहम्मद हुसेन याच्याकडे चालविण्यास दिली होती. मात्र भरधाव वेगामुळे वळणाचा अंदाज न आल्याने कारवरील ताबा सुटून हा भीषण अपघात झाला. फलटण ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.