नाशिक शहरासह जिल्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज सकाळपासून नाशिक शहरासह ग्रामीण भागात पावसाची संततधार सुरू आहे. काल हवामान विभागाने त्र्यंबकेश्वर व नाशिक परिसरासाठी अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार हवामान खात्याने 300 मिमीपर्यंत पावसाचा अंदाज वर्तावला आहे. मात्र शहरात मध्यरात्री पासून पावसाने जोर पकडल्याने गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज दुपारपर्यंत त्र्यंबकेश्वर आणि नाशिक मध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. असं असताना नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. त्र्यंबकेश्वर परिसरावर घोंगावणारे अतिवृष्टीचे आणि ढगफुटीसदृश पावसाचे मोठे संकट तूर्तास टळले आहे.
नाशिकवर घोंगावणारे संकट तूर्तास टळले
दरम्यान नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, सोमवारी पालघरमध्ये सुमारे 450 मिमी पाऊस कोसळलेला जोरदार पाऊस त्र्यंबकेश्वर–नाशिक मार्गे जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तावली होती. मात्र त्र्यंबकेश्वर–नाशिक मार्गे जाण्याची शक्यता असलेला हा पाऊस आता उत्तर दिशेला सुरतकडे आणि दक्षिण दिशेला अकोले म्हणजेच अहिल्यानगरच्या दिशेने पुढे सरकले आहेत. ज्यामुळे एकूण परिस्थिती सध्या नियंत्रणात असून नाशिक, त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटी धोका काही प्रमाणात कमी होणार आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वरच्या दिशेने वाहून येणारे ढग गुजरातच्या सुरत आणि अहिल्यानगरच्या अकोलेच्या दिशेने सरकत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. तरीदेखील नाशिक, इगतपुरी त्रंबकेश्वर भागात मुसळधार पर्जन्यवृष्टी कायम राहणार आहे. पावसाचा जोर कायम राहणार असल्यानं नागरिकांनी विनाकारण घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
धोका अद्याप पूर्णपणे टळला नाही…
मध्यरात्रीपासून नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर परिसरात संततधार पावसाची जोरदार हजेरी लावली. मध्यरात्रीनंतर त्र्यंबकेश्वर आणि नाशिक परिसरात पावसाचा जोर आणखी वाढला असून त्र्यंबकेश्वरच्या मेटघर किल्ला परिसरातील सुमारे 100 नागरिकांचे रात्री सुरक्षितस्थळी स्थलांतर केले. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यरात्री घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच लोकांनी बाहेर निघू नये असा इशारा दिला आहे. तसेच आज शाळा बंद आहे, यावेळी इगतपुरीच्या दक्षिण बाजूस जोर वाढला आहे. ज्या ज्या दरी डोंगरात वस्ती असेल काळजी घ्या. एकदा हानी झाली तर ती भरून निघत नाही. आता काही नुकसान नाही मात्र पावसाचा जोर वाढला आहे. असं देखील मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
आज शाळांसह अनेक ठिकाणी बंदी
नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट असल्याने नाशिक ग्रामीण,त्रंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि दिंडोरी या पाच तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. नाशिक सिमेवर असलेल्या भंडारदरा परिसरातील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. तसेच सांदन व्हॅली , कोकणकडा, रतनगड, अलंग, मदन, कुलंग, कळसूबाई शिखर बंद पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. रिव्हर्स वॉटरफॉलसह सर्व साहसी पर्यटन उपक्रमांवरही तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत पर्यटकांना भंडारदरा परिसरात प्रवेश नसणार असून आदेशाचे काटेकोर पालन करण्याच्या वनविभागाच्या सूचना दिल्या आहेत. सततचा मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने हा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.