Nimesulide Ban: सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लोकप्रिय वेदनाशामक औषध 'निमेसुलाइड' (Nimesulide) च्या 100 मिलीग्रामपेक्षा जास्त क्षमतेच्या गोळ्यांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर सरकारने तात्काळ प्रभावाने बंदी घातली आहे. हे औषध मानवी आरोग्यासाठी, विशेषतः यकृतासाठी (Liver) घातक ठरू शकते, असा इशारा आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.
कलम 26 अ अंतर्गत कारवाई
आरोग्य मंत्रालयाने 'ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स अॅक्ट, 1940 च्या कलम 26 अ अंतर्गत ही अधिसूचना जारी केली आहे. 'ड्रग्ज टेक्निकल अॅडव्हायझरी बोर्डा'च्या (DTAB) शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला असून, औषधाच्या दुष्परिणामांची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
बंदी घालण्यामागची प्रमुख कारणे
निमेसुलाइड हे एक 'नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग' (NSAID) आहे. अभ्यासानुसार, याचे जास्त डोस यकृताला इजा पोहोचवू शकतात. या औषधाच्या विषारीपणाबाबत (Toxicity) जगभरात अनेक शंका उपस्थित केल्या जात असून त्याबद्दल चौकशी सुरू आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, बाजारात या औषधाला अधिक सुरक्षित आणि प्रभावी पर्याय उपलब्ध असल्यामुळे धोकादायक औषध विक्रीची गरज नाही.
वेदनाशामक औषधांचे वाढते धोके
जास्त प्रमाणात आणि वारंवार वेदनाशामक (Painkillers) औषधे घेतल्यास केवळ यकृतच नाही, तर मूत्रपिंडावरही (Kidney) गंभीर परिणाम होऊ शकतात. सार्वजनिक आरोग्य सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने हे कठोर पाऊल उचलले आहे. कोणतेही वेदनाशामक औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मेडिकल स्टोअर्सनाही या प्रतिबंधित गोळ्यांची विक्री न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.