Kolhapur News : ‘लकी भास्कर’स्टाईल घोटाळा! खातेदाराच्या नावाने मॅनेजरने 1 कोटी 10 लाखांचे कर्ज उचलले; तब्बल चार वर्षांनंतर प्रकरण उघडकीस

Kolhapur News : ‘लकी भास्कर’स्टाईल घोटाळा! खातेदाराच्या नावाने मॅनेजरने 1 कोटी 10 लाखांचे कर्ज उचलले; तब्बल चार वर्षांनंतर प्रकरण उघडकीस

अमर पाटील, प्रतिनिधी 

कोल्हापूर : एका सामान्य माणसाच्या नावाने तब्बल एक कोटी दहा लाखांचं कर्ज,अन् हे कर्ज त्याने घेतलंच नव्हतं…त्याने बँकेकडून गाडीसाठी घेतलं कर्ज होतं. कर्जाचा हप्ता थकला म्हणून बँकेचा तगादा सुरू होता. पण जेव्हा तो कर्जदार सिबील (CIBIL) चेक करायला गेला, तेव्हा समोर आलेला आकडा पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेत घडलायं (लकी भास्कर) वेब सिरीज स्टाईल घोटाळा. 2020 ची गोष्ट…खातेदाराला कानोकान खबर न लागू देता, त्याच्या नावावर परस्पर 1 कोटी 10 लाखांचे कर्ज उचलले गेले. सिस्टीमच्या डोळ्यात धूळ फेकत मॅनेजरने हा खेळ खेळला. पण बँकेने यावर चार वर्षं पांघरूण घातलं. जेव्हा बँक मॅनेजरचा भांडाफोड झाला, तेव्हा बँकेने गपचूप त्याच्याकडून पैसे वसूल केले. त्याच्यावर केस ठोकली, पण ज्याच्या नावावर हा कर्जाचा डोंगर रचला गेला होता, त्या विशाल जाधवला मात्र अंधारात ठेवले. याबाबतची सविस्तर माहिती पीडित खातेदार विशाल जाधव यांनी दिली.  

हेही वाचा : El Nino Impact: पृथ्वी होरपळणार! 'एल निनो'मुळे 2026 हे इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष ठरण्याचा इशारा

शिवसेनेचे (उबाठा) पदाधिकारी आक्रमक पवित्रा घेऊन बँकेच्या  व्यवस्थापनाला धारेवर धरलं आहे. ही फसवणूक आहे…उद्या त्या मॅनेजरला काही बरं-वाईट झालं असतं, तर पोलीस या निष्पाप विशाल जाधवला उचलून जेलमध्ये टाकणार होते. त्याला जबाबदार कोण? 'आम्ही पैसे वसूल केले' असं सांगून बँक सुटू शकत नाही. विना कागदपत्रं 1 कोटी 10 लाखांचं कर्ज दिलंच कसं?,आम्ही विशाल जाधवांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली असल्याचे शिवसेना (उबाठा) शहर प्रमुख विशाल देवकुळे म्हणाले.

दरम्यान बँकेचे अध्यक्ष केदार हसबिनिस यांनी खुलासा करत संबंधित मॅनेजरवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असून सर्व संबंधित कागदपत्र न्यायालयात सादर करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ठेवीदार आणि सभासदांनी अजिबात काळजी करू नये, बँक भक्कम पायावर उभी असल्याचे श्री महालक्ष्मी को-ऑपरेटिव बँकेचे अध्यक्ष केदार हसबिनिस यांनी सांगितलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version