वर्धा : वर्ध्याच्या हेलोडी गणेशपूर येथे नवविवाहितेच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. लग्नानंतर हुंड्यासाठी छळ, अमानुष मारहाण, बळजबरीने गर्भपात आणि अखेर गळफासाच्या अवस्थेत नवविवाहित 22 वर्षीय महिला रोशनी मोहिते आढळली. मात्र तिच्या शरीरावरील जखमांच्या खुणा पाहून ही आत्महत्या नसून नियोजित खून असल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी पतीसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
नेमकं प्रकरण काय –
27 मार्च 2024 रोजी रोशनीचा विवाह मिलिटरीच्या एसएससीमध्ये कार्यरत विनोद मोहिते याच्याशी मोठ्या थाटामाटात झाला. सुखी संसाराची स्वप्ने उराशी बाळगून सासरी गेलेल्या रोशनीच्या आयुष्यात मात्र काही महिन्यांतच संकटांचा डोंगर कोसळल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. हुंड्यासाठी सातत्याने छळ, मानसिक व शारीरिक अत्याचार, मारहाण आणि गर्भवती असताना तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने गर्भपात करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. त्यानंतर 10 ते 11 जुलैदरम्यान रोशनी घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. मात्र मृतदेह पाहिल्यानंतर कुटुंबीयांचा संशय अधिकच बळावला. रोशनीच्या अंगावर आणि पाठीवर पट्ट्याने मारल्यासारखे स्पष्ट वळ, तर हातावर ओरबडल्याच्या जखमा दिसत असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे हा आत्महत्येचा प्रकार नसून आधी मारहाण करून तिचा खून करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी पतीसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली. या घटनेचा पुढील तपास सिदी रेल्वे पोलीस करत आहे.
दरम्यान, माझ्या लेकीला न्याय मिळावा. तिच्यावर अत्याचार करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी अश्रूंनी भरलेली मागणी रोशनीची आई गंगाबाई जाधव यांनी केली. तर हुंड्याच्या हव्यासापोटी आणि सततच्या छळामुळेच आपल्या मुलीचा जीव गेला, असा गंभीर आरोप रोशनीचे वडिल राजू जाधव यांनी केला आहे. एकीकडे पोलीस तपास सुरू असताना दुसरीकडे आपल्या लेकीसाठी न्याय मागणाऱ्या कुटुंबीयांचा आक्रोश संपूर्ण वर्धा जिल्ह्याला हादरवून सोडला आहे. आता या प्रकरणात तपासातून नेमकं काय सत्य समोर येतं आणि दोषींवर किती कठोर कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.