Raj Thackeray On NCP Leadership: ‘राष्ट्रवादीचा अध्यक्ष पटेल नाही, पाटील असावा’; राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून राज ठाकरे यांचा सूचक टोला

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून राज ठाकरे यांनी सूचक टोला लगावला.
Raj Thackeray On NCP Leadership: ‘राष्ट्रवादीचा अध्यक्ष पटेल नाही, पाटील असावा’;  राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून राज ठाकरे यांचा सूचक टोला

Raj Thackeray On NCP Leadership:राज्याच्या राजकारणात आज मोठ्या घडामोडी घडल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यासह त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या असून, राज्याच्या राजकीय इतिहासात हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. राजभवनात पार पडलेल्या शपथविधी समारंभात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भविष्यातील नेतृत्वाबाबत चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार यांच्या पश्चात पक्षाचा अध्यक्ष कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सूचक प्रतिक्रिया देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.

राज ठाकरे यांनी नाव न घेता खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला. “राष्ट्रवादी काँग्रेससारखा अस्सल मराठी मातीतील आणि रांगडा पक्षाचा अध्यक्ष हा मराठीच असावा. पाटील चालेल, पण पटेल नको,” असे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सध्याच्या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदासाठी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी त्यांचा प्रस्ताव मांडला, तर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी त्यास अनुमोदन दिले. या निर्णयानंतर पक्षातील नेतृत्वाची धुरा सुनेत्रा पवार यांच्या हाती आली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्रिपदानंतर सुनेत्रा पवार यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नेमण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी पक्षात सह्या गोळा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची चर्चा आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्याचे राजकारण पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले असून, पुढील काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणते निर्णय घेतले जातात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version