Ganesh Idol Santacruz: शिवरायांच्या 50 किल्ल्यांच्या पावन मातीतून साकारली गणरायाची मूर्ती; सांताक्रूझच्या मंडळाचा अनोखा उपक्रम

मुंबईतील सांताक्रूझ येथील स्वामी विवेकानंद सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवत गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेतले आहे
Ganesh Idol Santacruz: शिवरायांच्या 50 किल्ल्यांच्या पावन मातीतून साकारली गणरायाची मूर्ती; सांताक्रूझच्या मंडळाचा अनोखा उपक्रम

मुंबई: मुंबईतील सांताक्रूझ येथील स्वामी विवेकानंद सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवत गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेतले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील तब्बल ५० ऐतिहासिक किल्ल्यांची पवित्र माती एकत्र करून त्या मिश्रणातून श्री गणरायाची मूर्ती साकारण्यात आली आहे. इतिहास, संस्कृती आणि श्रद्धेचा संगम घडवणारी ही संकल्पना यंदाच्या गणेशोत्सवातील विशेष आकर्षण ठरत आहे.

शिवरायांच्या किल्ल्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, शौर्याची आणि पराक्रमाची साक्ष दिली आहे. या ऐतिहासिक वारशाची ओळख नव्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने मंडळाने हा अभिनव उपक्रम हाती घेतला. राज्यातील विविध दुर्गांवरून आणलेली पवित्र माती एकत्र करून त्यातून गणेशमूर्ती घडवण्यात आल्याने या मूर्तीला वेगळे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

हेही वाचा: Badlapur Govinda Accident : बदलापूरच्या दहीहंडीत थरारक प्रसंग! सातव्या थरावरून गोविंदा थेट खाली कोसळला; सेफ्टी बेल्ट तुटल्याने घटना

मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही परंपरा जपत भायखळा ते सांताक्रूझ असा पायी प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी मुंबईतील विविध प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सदिच्छा भेटी देत आपल्या अनोख्या उपक्रमाची माहिती दिली. तसेच गणेशोत्सवाच्या शुभेच्छांची देवाणघेवाण करत समाजात ऐतिहासिक वारसा जपण्याचा संदेशही दिला.

या अभिनव संकल्पनेचे मुंबईतील अनेक नामांकित गणेशोत्सव मंडळांनी कौतुक केले. चिंचपोकळीचा चिंतामणी, काळाचौकीचा महागणपती, लालबागचा राजा, तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि गणेश गल्लीतील मुंबईचा राजा या मंडळांनी स्वामी विवेकानंद सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या या उपक्रमाचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा: Mumbai Crime: चिंतामणीच्या आगमन सोहळ्यात हातचलाखी! चिंचपोकळीत 11 भाविकांचे महागडे मोबाईल गायब; पोलिस तपास सुरू

इतकेच नव्हे, तर कला आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. शिवरायांच्या गड-किल्ल्यांबद्दल अभिमान निर्माण करण्यासोबतच इतिहासाशी भावनिक नाते जोडणारा हा प्रयत्न असल्याचे अनेकांनी नमूद केले.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मूल्ये जपण्याचे प्रभावी व्यासपीठ आहे. शिवरायांच्या किल्ल्यांच्या पवित्र मातीतून साकारलेला हा गणराय महाराष्ट्राच्या परंपरेचा, स्वाभिमानाचा आणि भक्तीभावाचा संदेश देत भाविकांसाठी प्रेरणेचे केंद्र ठरत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version