मुंबई : ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारी माहिती दिली आहे. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आला असून कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी राज्य सरकारने जाही केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची दुसरी यादी आज, शुक्रवारी प्रसिद्ध झाली असून या यादीत एकूण 3 लाख 55 हजार 614 शेतकऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, पात्र शेतकऱ्यांनी यादीतील आपले नाव तपासून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे. ही यादी जिल्हानिहाय आणि बँकनिहाय प्रसिद्ध करण्यात आली असून, ती संबंधित बँक शाखा, विकास संस्था तसेच ग्रामपंचायतींमध्येही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांनी 31 मार्च 2026 रोजीची कर्ज थकबाकीची रक्कम तपासून नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’मध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करावे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर जमा करण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत वितरित झालेली, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली पीक कर्जे तसेच पुनर्गठित व फेरपुनर्गठित कर्जांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.
विभागनिहाय पात्र लाभार्थी
छत्रपती संभाजीनगर विभाग – 1 लाख 95 हजार 899
अमरावती विभाग – 71 हजार 796
नागपूर विभाग – 34 हजार 520
नाशिक विभाग – 25 हजार 471
पुणे विभाग – 23 हजार 117
कोकण विभाग – 4 हजार 811
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.