मागील काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुद्दा सर्वत्र गाजत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर राज्यात सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील गौरव यात्रेत सहभाग नोंदवला आणि विरोधकां खडेबोल सुनावले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सावरकरांचे विचार रोखण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. तसेच हिंदुत्वाला बदनाम केले जात आहे. मात्र, आता देशातील हिंदू जागरुक झाला आहे. पण काही जण त्यांचा अपमान करत आहेत. त्यामुळे त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी, त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी राज्यात सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
सावरकरांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. सावरकरांचा अपमान केल्यामुळे मणिशंकर अय्यर यांना जोडे मारणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगणारे आता राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. देशात वारंवार सावरकरांचा अपमान केला जात आहे. मात्र, या सरकारमधील कोणतीही व्यक्ती सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
तसेच, सावरकरांसारख्या अनेक क्रांतीकारकांमुळे सर्व स्वातंत्र्य उपभोगत आहोत. सावरकर हे देशभक्त होते. त्यामुळे त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.