सातारा: यावर्षीच्या उन्हाळ्याने राज्यातील नागरिकांना अक्षरशः हैराण केले असून, तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक भागांत तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून, त्याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसत आहे. अशातच सातारा जिल्ह्यात पाणीटंचाईचे गंभीर संकट उभे ठाकले असून, अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जिल्ह्यातील तब्बल 35 गावे आणि 186 वाड्यांमध्ये पाणीटंचाईची झळ पोहोचली आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून सध्या 29 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र विहिरी, बोअरवेल आणि नाले कोरडे पडल्याने परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे.
माण तालुक्यातील बिजवडी, पाचवड, पांगरी, येळेवाडी, मोगराळे, अनभुलेवाडी, थदाळे, मोही, दानवलेवाडी, हस्तनपूर, संभूखेड, कारखेल, मार्डी, पानवण, शिरवली, वारूगड, उकीर्डे, कोळेवाडी, महिमानगड, परकंदी, शिंदी बु., दोरगेवाडी या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच वाई तालुक्यातील गुंडेवाडी, मांढरदेव, बालेघर, आनंदपूर आणि पाटण तालुक्यातील जाधववाडी, जंगलवाडी, भोसगाव, शिद्रुकवाडी, वरची शिद्रुकवाडी, कोळेकरवाडी या भागांनाही टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.
पाणीटंचाईमुळे केवळ नागरिकच नव्हे, तर पशुधनालाही मोठा फटका बसत आहे. जनावरांसाठी पाण्याची कमतरता भासत असल्याने त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी सांगितले की, दरवर्षी उन्हाळ्यात हीच परिस्थिती उद्भवते. “पिण्याचे पाणी मिळणे कठीण होते, त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो,” अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी आणि संबंधित यंत्रणा पाणीटंचाई दूर करण्यासाठी कोणती पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच, साताऱ्यातील ही परिस्थिती पाणी संवर्धन आणि योग्य नियोजनाची गरज अधोरेखित करणारी ठरत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.