मुंबई: राज्यात पुढील काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थानांच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच, पंचायत समितीचे सभापती, उपसभापतीसाठी नुकतीच सोडत काढण्यात आली होती. आता राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यपदांच्या आरक्षणासाठी सोडत 13 ऑक्टोबर 2025 रोजी काढण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील 32 जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या 336 पंचायत समित्यांसाठी ही सोडत काढली जाईल. यासह, संबंधित जिल्हाधिकारी 10 ऑक्टोबर रोजी वृतपंत्रांत सूचना प्रसिद्ध करतील. 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत पार पडल्यानंतर त्याची प्रारुप अधिसूचना जारी होईल. त्यावर नागरिकांना 14 ते 17 ऑक्टोबर दरम्यान हरकती आणि सूचना नोंदवता येतील. प्राप्त हरकतींचा विचार करून अंतिम अधिसूचना 3 नोव्हेंबर 2025 रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध होईल.
राज्यातील सध्याच्या राजकीय वातावरणात या निवडणुका प्रत्येक पक्षासाठी प्रतिष्ठेच्या ठरणार आहत. महायुती आणि महाविकास आघाडी आपआपल्या आघाड्यातून निवडणूक लढवणार की स्वतंत्रपणे स्वबळ आजमावणार, हे स्पष्ट व्हायचं आहे. यादरम्यान, राजकारणात आणखी एका शक्य युतीची चर्चा रंगू लागली आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकत्र येणार का? हा प्रश्न सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र, उमेदवारीचे गणित आरक्षणावर अबलंबून असल्याने सर्वच पक्षांची नजर 13 ऑक्टोबरच्या सोडतीवर खिळली आहे. या सोडतीनंतर कोणाचे राजकीय गणित जुळणार आणि कोणाचे बिघडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.