छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ठाकरे सेनेला मोठा धक्का बसला आहे. फुलंब्री नगरपंचायतीच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. उबाठाचे नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांच्यासह नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत हा पक्षप्रवेश करण्यात आला. खासदार श्रीकांत शिंदे, पालकमंत्री संजय सिरसाट, खासदार संदिपान भुमरे, आमदार विलास बापू भुमरे, आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशामुळे फुलंब्री तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली असून आगामी काळात शहरातील विकासकामांना अधिक गती मिळणार असल्याचा दावा उपस्थित नेत्यांनी केला.
नगराध्यक्ष ठोंबरे यांनी समर्थक नगरसेवकांसह शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय दोन महिन्यांपूर्वीच घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या दोन बैठका झाल्या होत्या. शहराच्या विकासासाठी भरीव निधी आणि विविध विकासकामांबाबत ठोंबरे यांनी काही मागण्या केल्या होत्या. त्यांना शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. दरम्यान, स्थानिक भाजप नेत्यांच्या विरोधामुळे प्रवेश लांबणीवर पडला होता. मात्र, आता अडथळे दूर झाल्याचे सांगण्यात येत असून शहराच्या विकासाला गती देण्यासाठी सत्ताधारी गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे ठोंबरे समर्थकांचे म्हणणे आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.