फुगेवाडी आणि हडपसर परिसरात मिथेनॉलमिश्रित विषारी हातभट्टी दारू पिऊन १७ जणांचा मृत्यू झाला. यावेळी फुगेवाडी येथे 12, तर हडपसरमधील काळेपडळ आणि पांढरेमळा परिसरात 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये घडली. या घटनेने परिसर हादरले असून यासंबंधीत अनेक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील उपचारासाठी दाखल असलेल्या काही जणांची प्रकृती अजूनही गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या दुर्घटनेनंतर पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक प्रशासनाने कारवाई सुरू केली असून, अनेक आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केला आहे.
दरम्यान हडपसर येथील विषारी दारुकांड वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला भोवलं आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह इतर दोन पोलिस कर्मचाऱ्यांना सुद्धा निलंबित करण्यात आले आहे. कालच संबंधीत प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांना संबंधित ठिकाणी छापे मारून कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर घटनेतील निष्काळजीपणा पुणे पोलिसांना भोवला आहे. हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्यासह पोलिस निरीक्षक हसीना सिकलगार, उपनिरीक्षक हसन मुलानी यांचे निलंबन करण्यात आले आहे.
तर फुगेवाडी विषारी दारू प्रकरणी 10 जणांच्या मृत्यू नंतर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी देखील मोठी कारवाई केली आहे. दापोडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय वाघमारे तसेच तपास पथकाचे इंचार्ज आणि 4 कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. तर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांची पोलीस नियंत्रण कक्षात रवानगी करण्यात आली आहे. कर्तव्यास कसुरी केल्याचा ठपका ठेवत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांनी ही मोठी कारवाई केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.