‘समृद्धी महामार्ग शापित’

‘समृद्धी महामार्ग शापित’

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर खासगी बसच्या झालेल्या अपघातात २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी झाले आहेत. हा अपघात झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घटनास्थळावर काही वेळातच पोहचणार आहेत. मात्र या अपघातावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी धक्कादायक विधान केले आहे. समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग आहे. या रस्त्यात अनेकांचे अश्रू आणि शाप आहेत. त्यामुळे हे अपघात होत असल्याचे धक्कादायक विधान संजय राऊत यांनी केले.

संजय राऊत यांनी समृद्धी महामार्गावरील अपघातांवर बोलताना राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. गेल्या वर्षभरात राज्यात अपघातांचे प्रमाण खूपच वाढले आहे. आज २६ लोकं मरण पावली. हे दुर्देव आहे. समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग झाला आहे. तो शापित का झाला यासाठी खोलात जाण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने तो महामार्ग बनवण्यासाठी या सरकारने मनमानी केली, त्याच्या अनेक गोष्टी बाहेर येतील. दुर्देवाने त्या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. मृत्यू होत आहेत हे काही चांगले लक्षण नाही. किती वेळा श्रद्धांजली वाहायची? वेग मर्यादेबाबत आम्ही मागण्या केल्या आहेत. पण त्यावर कुठलाही निर्णय होत नाही. भ्रष्टाचारातून निर्माण झालेला तो रस्ता आहे असे माझे मत आहे. अनेकांच्या जमिनी हडप करण्यात आल्या. जबरदस्तीने घेण्यात आल्या. अनेकांचे शाप आणि अश्रू त्या रस्त्यात मला दिसत आहे. त्यामुळे हा अपघात होत नाही ना, असं वाटतं, असं संजय राऊत म्हणाले.

बुलढाण्यात २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्याबद्दल आमच्या मनात संवेदना आहे. मृतांना आमची श्रद्धांजली आहे. पण जनतेच्या प्रश्नावर मोर्चा निघेल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. आदित्य ठाकरे यांनी रस्ते घोटाळा आणि स्ट्रीट फर्निचर घोटाळ्यावर आवाज उठवला आहे. ज्यांच्यावर चौकशी व्हायला हवी होती असे सगळे नग भाजप आणि शिंदे गटाने त्यांच्या पक्षात घेतले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

भाजपनेही आजच मोर्चाची हाक दिली आहे. तसेच चोर मचाये शोर असे म्हणत ठाकरे गटाच्या मोर्चाला प्रत्युत्तर दिले जाणार आहे. त्यावरूनही राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपची ही नौटंकी आहे. विशेषत: मुंबईतील भाजपची नौटकी आहे. यांना कोणतीही दिशा नाही. हिंमत असेल तर निवडणुका घ्या. म्हणजे शोर कोण करतोय आणि चोर कोण हे कळेल,असे आव्हान त्यांनी दिले. निवडणुका घ्यायच्या नाहीत. निवडणुकांना सामोरे जायचे नाही आणि नौटंकी करायची. आमचा आजचा मोर्चा पाहून राजकीय विरोधकांच्या डोळ्याची बुबुळं बाहेर येतील. हिंमत असेल तर निवडणुका घ्या. ज्यांना विजयाची खात्री आहे तेच हिंमत दाखवू शकतात. आमच्या सारखे जे लोक आहे, त्यांना विजयाची खात्री असल्यानेच आम्ही आव्हान देत आहोत, असेही ते म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version