तुर्कीमध्ये आलेल्या भूकंपामुळे तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाचे ४० हून अधिक धक्के बसले. यामुळे, तेथील हजारो घरे आणि इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. ढिगाऱ्याखाली अडकून सुमारे ४००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तुर्कीत भीषण भूकंप झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीनं बैठक घेत भारतीय जवानांच्या एका तुकडीसह एनडीआरएफचे १०० जवान तुर्कीतील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर भारतीय हवाई दलाचे विमान तुर्कीच्या दिशेनं झेपावले, परंतु तुर्कीच्या मदतीसाठी निघालेल्या भारतीय विमानांना हेकेखोर पाकिस्तानने त्यांच्या हवाई हद्दीत प्रवेश नाकारल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. त्यामुळं भारतीय विमानांना पाकिस्तानची हवाई हद्द सोडून वळसा घालत तुर्कीत दाखल व्हावं लागलं आहे.
तुर्कीतील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी निघालेली भारतीय विमानं ही पाकिस्तानच्या हद्दीतून जाणार होती. परंतु पाकिस्तानी एटीसीनं भारतीय विमानांना पाकिस्तानी हद्दीत प्रवेश नाकारला. त्यानंतर भारतीय विमानांना पाकिस्तानी हवाई हद्द सोडून मोठा वळसा घालत तुर्कीला पोहचावं लागलं. त्यामुळं एखादा देश भीषण संकटात सापडलेला असतानाही त्याला मदत करणाऱ्या भारताच्या पायात आडकाठी घालणाऱ्या पाकिस्तान सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. अनेक लोकांनी सोशल मीडियावर पाकिस्तानी सरकारवर जोरदार टीका करत भारतीय सैन्याच्या धैर्याचं कौतुक केलं आहे.
विशेष प्रशिक्षित श्वानपथकासह एनडीआरएफच्या जवानांची दोन पथकं आणि आवश्यक उपकरणं तसेच जीवनावश्यक वस्तूंचा साठा भारताकडून तुर्कीमध्ये पोहोचला आहे. तुर्कीचे भारतातील राजदूत यांनी तुर्कीला मदत केल्याबद्दल भारताचे आभार मानले आहेत. फिरात सुनेलने भारताचे आभार मानले आणि म्हणाले, ‘संकटात मदतीला धावतो तोच खरा मित्र.’
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.